– श्रीदत्त गायकवाड, सचिन मेनकुदळे कार्याध्यक्षपदी
– ११ जूनला होणार नाशिकमध्ये राज्याचे अधिवेशन
नवी दिल्ली :- प्रिंट, ईलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल माध्यमांतील पत्रकारांप्रमाणेच रेडिओ माध्यमातील पत्रकारांनाही अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आतापर्यंत ‘रेडिओ जर्नालिझम’च्या समस्येकडे गंभीरतेचे लक्ष देण्यात येत नव्हते. परंतु देशभरातील पत्रकारांची एकजूट करीत स्थापन झालेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या संघटनेने रेडिओ माध्यमातील पत्रकारांनाही न्याय देण्याचा निश्चय केला आहे. त्यादृष्टीने पावले टाकत रेडिओ विंगची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
रेडिओ विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी जळगावचे अमोल देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी पुण्याचे श्रीदत्त गायकवाड, छत्रपती संभाजीनगरचे सचिन मेनकुदळे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी स्वप्नाली भुयान (दिब्रुगढ ,आसाम), संदीप कुलक्षेत्र (उज्जैन, मध्य प्रदेश), अक्षय कुलकर्णी (बेळगाव ,कर्नाटक), मानविन्दर नेगी (रुद्रप्रयाग ,उत्तराखंड) यांची निवड करण्यात आली आहे. सरचिटणीसपदी दिल्लीच्या डॉ. सुगंधा शौत्रिया असतील. सहसरचिटणीस म्हणून गुजरातच्या दाहोदचे अब्बास खरोदावाला हे काम पाहणार आहे. कोषाध्यक्षपदाची धुरा सांगलीचे युवराज जाधव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. छपरा बिहारचे अभिषेक अरुण आणि त्रिपुरातील आगरतलाचे देबानजना देव्बरमण हे रेडिओ विंगचे कार्यवाहक असतील. संघटकपदी नाशिकचे पुष्कर जोशी, आसामच्या दिब्रुगढचे भास्कर भुयान, गुजरातच्या वल्लभ विद्यानगरचे परेश पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगावचे संदीप केदार यांची प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अकलूजचे शंकर बागडे, आंध्र प्रदेशचे के. सत्यवती हे सदस्य असतील.
कार्यकारिणीच्या अनुषंगाने झालेल्या बैठकीला ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, दिव्या भोसले पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष तथा जळगावचे अमोल देशमुख रेडिओ विंगचे कार्याध्यक्ष तथा छत्रपती संभाजीनगरचे सचिन मेनकुदळे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा पुण्याचे श्रीदत्त गायकवाड, उपस्थित होते. रेडिओ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल देशमुख यांनी देशपातळीवर रेडिओ विंगच्या सुरू असलेल्या कामाची माहिती यावेळी दिली. प्रिंट, ईलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल मीडियाप्रमाणे रेडिओ माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांनाही विविध समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’नावाच्या व्यासपीठाचा वापर करावा, असे आवाहन यावेळी संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले. लवकरच रेडिओत काम करणाऱ्यांचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्ली येथे घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून होणारे रेडिओ विंगचे राष्ट्रीय अधिवेशन कर्मचाऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे पहिले राष्ट्रीय अधिवेशन असेल. हे अविस्मरणीय व्हावे, अशी अपेक्षा काळे यांनी व्यक्त केली.
नाशिक अधिवेशनाची तयारी
महाराष्ट्रातील रेडिओ विंगचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन नाशिक येथे ११ जून रोजी होणार आहे. या अधिवेशनाच्या तयारीचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र रेडिओ विंगचे प्रदेशाध्यक्ष इरफान सय्यद यांनी यावेळी अधिवेशनाच्या कामाचा आढावा सादर केला. आतापर्यंत कधीही कोणत्याही संघटनेने रेडिओत काम करणाऱ्यांची दखल घेतली नव्हती. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ हे एकमात्र पत्रकारांचे असे संघटन आहे, ज्याने रेडिओ क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना एक छत्राखाली आणण्याचे काम केले, असे यावेळी सय्यद म्हणाले.