छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमले मनपा परिसर

– मनपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

नागपूर :- हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मनपातील महापौर कक्षा समोरील दालनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपाचे अतिरिक्त आयुक्त (सेवा) अजय गुल्हाने, मनपाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार, उपायुक्त रवींद्र भेलावे, मिलींद मेश्राम, घनकचरा व्यवस्थान विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त (सा.प्र.वि.) प्रकाश वराडे, आयटी विभाग प्रमुख महेश धामेचा,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, शिक्षणाधिकारी राजेंद्र पुसेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी  राजेंद्र उचके यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थिती होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमला.विशेष म्हणजे हा संपूर्ण कार्यक्रम झिरो वेस्ट या संकल्पनेवर घेण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्राचे राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ गायले गेले. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी स्वतः साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रेखाचित्राचे नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

यानंतर गायक तथा वादक प्रकाश कलासिया, मंजुषा फुलंबरकर, कमलाकर मानमोडे, शुभांगी पोहरे, तबला वादक कुणाल दाहेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गीत सादर करण्यात आले. यावेळी मनपाच्या एकात्मता उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींनी लेझीम प्रात्यक्षिक सादर केले. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत त्यांचा उत्साह वाढविला. छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान केलेल्या शिवाजी महाराजांनी लक्ष वेधले.

 

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com