महाकाली यात्रेस मनपा प्रशासन सज्ज,९० अधिकारी कर्मचाऱ्यांची टीम सांभाळणार व्यवस्था

चंद्रपूर  :- चंद्रपूर शहरात “देवी महाकाली” यात्रेस २७ मार्चपासून सुरवात होत आहे. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेची राज्यभरातील भाविक आतूरतेने वाट पाहत असतात. राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या भाविकांच्या सुविधेच्या दृष्टीने चंद्रपूर मनपा प्रशासनद्वारे तयारी करण्यात आली असुन ९० अधिकारी कर्मचारी व्यवस्थेत सज्ज आहेत.

महानगपालिका प्रशासनातर्फ़े झरपट नदी पात्रातील इकोर्निया वनस्पती काढून पात्र स्वच्छ करण्याचे काम सुरु आहे, बैलबाजार भागात पटांगणाची पूर्णतः सफाई करण्यात आली असून याच भागात भक्तांकरिता मांडव टाकण्याचे काम सुरू आहे. भाविकांना पिण्यासाठी विविध चौकात १००० लिटरची क्षमता असलेल्या १५ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत असुन भूमिगत पाईप टाकुन पाण्याचे नळ उभारण्यात येऊन पाण्याचे टँकरसुद्धा सज्ज ठेवण्यात येणार आहे. 

भाविकांना आंघोळीसाठी स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टीने शॉवरद्वारे आंघोळीची व्यवस्था करण्यात येत आहे त्याचप्रमाणे सुलभ शौचालय, प्री कास्ट व फिरते शौचालय यांची व्यवस्था केली जात आहे. भाविकांकरीता यात्रा परिसरात मंडप तसेच बैल बाजार परीसर, पंजाबी वाडी व संपूर्ण यात्रा परीसरात विदयुत व्यवस्था उभारली जात आहे. निःशुल्क प्रथोमपचार वैद्यकीय सेवा तसेच २४ तास रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात येणार असुन वेळप्रसंगी नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास नागरीकांना स्थलांतरीत करण्याकरीता मनपाच्या ७ शाळा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

या काळात मंदिर परिसरात मोठी गर्दी असल्याने खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्स लावण्यात येतात या स्टॉल्सला परवानगी देणे व त्यांची बैठक व्यवस्थाही करण्यात येत आहे. येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून झरपट बंधारा,कोहीनूर मैदान,बैलबाजार भाग, गौतमनगर सुलभ शौचालय व शासकीय अध्यापक विद्यालय जवळील जागांची पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. सदर महाकाली मंदिर यात्रा ६ एप्रिल पर्यंत सुरु राहणार असुन या उत्सवा दरम्यान नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com