मुखपत्र,स्कॉलरशिप,फेलोशिपचा होणार शुभारंभ

– व्हॉइस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांची ११ आणि १२ मार्चला बारामतीत कार्यशाळा.

मुंबई : व्हॉइस ऑफ मीडियाच्या केंद्रीय, राज्य, विभागीय व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक शनिवारी ११ आणि १२ मार्च रोजी बारामती क्लब येथे आयोजित करण्यात आली आहे. दोन दिवस चालणाऱ्या बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयांवर नियोजन करण्यात येणार आहे.

व्हॉइस ऑफ मीडिया या केंद्रीय संघटनेची स्थापना होऊन जेमतेम वर्षभराचा कालावधी लोटला आहे. या वर्षभरात संघटनेने पत्रकारांसाठी केलेल्या कामांचा व योजनांचा लेखाजोखा या बैठकीमध्ये मांडण्यात येणार असून आगामी काळात करावयाचे नियोजन यावेळी ठरविण्यात येणार आहे.

या ११ मार्चला बैठकीमध्ये पत्रकारांच्या पाल्यांसाठी पत्रकारांसाठी देण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप, फेलोशिप चा शुभारंभ होणार आहे. यासोबतच काही पदाधिकाऱ्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. ‘व्हॉइस ऑफ मीडिया‘चे मुखपत्र असलेल्या साप्ताहिकाचा प्रकाशन सोहळा आणि व्हॉइस ऑफ मीडिया च्या पोर्टलचे उद्घाटन या बैठकीदरम्यान होणार आहे.

दुसऱ्या दिवशी रविवारी दिनांक १२ रोजी सर्व पदाधिकाऱ्यांना बारामतीमध्ये नव्याने झालेले प्रयोग, योजना आदींची माहिती देऊन त्यांच्या प्रकल्प भेटींचे आयोजन करण्यात येणार आहे. अनेक नवीन प्रकल्प व संकल्पना त्यांना दाखविल्या जातील.

या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये पत्रकारांच्या पाल्यांच्यासाठी शिक्षण, पत्रकारांना घरे, पत्रकार भवन, तसेच संघटनेच्या वतीने चालविण्यात येणारे सामाजिक उपक्रम आदी विषयांवर विचार मंथन व नियोजन होईल. संघटनेच्या विविध विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याचे अहवाल सादर केले जातील. त्या अहवाला विषयी शासन दरबारी पाठपुरावा केला जाणार आहे.

संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, केंद्रीय उपाध्यक्ष धर्मेंद्र जोरे, मंदार फणसे, कार्यअध्यक्ष संजय आवटे, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजा माने उपाध्यक्ष अनिल मस्के आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन ‘व्हॉइस ऑफ मीडिया‘ संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, स्वागतअध्यक्ष चेतन बंडेवार यांनी केले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com