खंडणी मागणाऱ्या मनसेचा जिल्हाध्यक्ष दुरुगकरला अटक..

नागपूर –  एका दुकानदाराला दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुगकर यास गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना उमरेड तालुक्यातील कुही येथे घडली.

दुरुगकर हा आपल्या चार पाच कार्यकर्त्यांना घेऊन कुही गावात गेला. आम्ही एफडीएचे अधिकारी आहोत असे सांगून एका दुकानाची झाडाझडती घेतली. दुकानात सुगंधी तंबाखू आढळल्याचे सांगून दोन लाखांची खंडणी मागितली. दुकनदालाही तो अधिकारी वाटला. ३० हजार रुपये देण्याची त्याने तयारी दर्शवली. दुकानात धाड पडल्याने गावकरीसुद्धा येथे गोळा झाले होते. या दरम्यान दुकानात नेहमी येणारा डेली कलेक्शन करणारा एक व्यक्ती आला. त्याने अधिकारी असल्याचा पुरावा मागितला. आपले बिंग फुटत असल्याचे बघून दुरुगकर सोबत असलेले कार्यकर्ते पळून गेले. मात्र दुरुगकर गावकऱ्यांच्या तावडीत सापडला. त्यांनी दुरुकरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यामुळे मनसेमध्ये एकच खळबळ उडाली. बदनामी टाळण्यासाठी काही प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने हालचाली करून प्रकरण दडवण्याचे प्रयत्न केले. एक बडा पदाधिकारी पोलिस उप अधीक्षकाच्या संपर्कात असून गुन्हा दाखल होऊ नये याकरिता दबाव टाकत आहे अशी चर्चा सुरू होती. दुरुगकर याच्यावर यापूर्वीसुद्धा खंडणी मागण्याचे आरोप आहेत. अलीकडेच मनसेच प्रमुख राज ठाकरे यांनी नागपूर जिल्हा (ग्रामीण) दुरुगकर यास बढती देऊन जिल्हाध्यक्ष केले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com