जिल्हा परिषदेत होणार मेगाभरती

557 पदांसाठी राबविण्यात येणार भरतीप्रक्रिया

नागपूर :- शासकीय नोकरीसाठी इच्छुक असलेल्या स्पर्धा परीक्षार्थींसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेत यंदा मेगाभरती होणार असून विविध संवर्गातील 557 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी दिली.

जिल्हा परिषदेतील सभागृहात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शर्मा यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेले विविध अभिनव उपक्रम व योजनांची माहिती दिली. जिल्हा परिषदेत 2016 मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानंतर गेल्या काही वर्षात पदभरती करण्यात आलेली नाही. यंदा कनिष्ठ अभियंता ते लिपिक पदापर्यंतची सर्वच स्तरावरील पदे भरली जाणार आहेत. ही परीक्षा आयबीपीएस या संस्थेमार्फत राबविली जाणार आहे. परीक्षा ही आनलाईन पद्धतीने होणार आहे. आयबीपीएससोबत या भरती प्रक्रियेसंदर्भात करार करण्यात आला आहे. जुलै महिन्यात जाहिरात प्रसिद्धीस देत वर्षाअखेरीस भरतीपक्रिया पूर्ण करण्याचा मानस असल्याचे शर्मा यांनी पुढे सांगितले.

जि.प.तील शाळांमध्ये ‘फायनान्शिअल लिटरसी’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता यावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात व्यवसाय कसा करावा, व्यवसायासाठी आवश्यक माहिती, अर्थसाक्षरता म्हणजे काय,कर भरणे, गुंतवणूक करणे आदी विविध अर्थशास्त्रीय संकल्पनांची माहिती शिक्षकांमार्फत देण्यात येणार आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये शालेय वर्गापासून अर्थसाक्षरतेचे धडे गिरवता येईल. याशिवाय शैक्षणिक सुधारणासाठी विनोबा ॲप चा प्रयोग यशस्वी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यंदाची जि.प.मार्फत शिक्षक भरती प्रक्रिया ही आनलाईन पद्धतीने राबविण्यात आली. यात कुठलाही मानवी हस्तक्षेप नव्हता. संपूर्ण बदलीप्रक्रिया ही पारदर्शकपणे राबविण्यात आली. इतर जिल्ह्यातून 47 शिक्षक नागपूर जिल्ह्यात आंतरजिल्हा बदली करून आल्याची माहिती शर्मा यांनी यावेळी दिली. गरज असेल त्या ठिकाणी शिक्षक दिले जातील. तसेच काही श्रीमंत ग्रामपंचायतींनी अतिरिक्त शिक्षक भरण्याची तयारी ठेवल्यास परवानगी दिली जाईल, असे स्पष्ट केले.

निरक्षरांना साक्षरतेचे धडे देण्यासाठी नई किरण हा उपक्रम राबविण्यात येतोय. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद सर्व स्तरातून मिळाला आहे. प्रौढ शिक्षणात जि.प.ने आघाडी घेतली असून २०० महिलांनी मॅट्रिक परीक्षेत यश मिळवले आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची मदत घेण्यात आली असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियाना टप्पा २ साठी 243 गावांची निवड करण्यात आली आहे. अनेक विभागांचा या अभियानात सहभाग आहे. अनेक गावांमध्ये युद्धपातळीवर कामांना सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर यांच्यासमवेत या अभियानाचा नियमितपणे आढावा घेण्यात येत आहे. मिशन मोडवर हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

प्रत्येक गावातील पाण्याचा स्त्रोत तपासण्याची मोहीम, भिवापुरी मिर्चीला लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न, जिल्हा परिषदेमार्फत लँड बँक निर्माण करणे आदी महत्वाच्या उपक्रमांची अंमलबजावणी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) विपुल जाधव उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

योगा दिना निमित्य सकाळी ५ वाजता पासून मेट्रो सेवा उपलब्ध

Wed Jun 21 , 2023
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (नागपूर मेट्रो रेल प्रकल्प) • चार ही मार्गिकेवरील मेट्रो स्टेशन येथून मेट्रो सेवा उपलब्ध नागपूर :- जागतिक योगा दिवस सर्वत्र साजरा केल्या जाणार असून २१ जून ( बुधवार) रोजी सकाळी ५ वाजता चार ही मार्गिकेवरील मेट्रो स्टेशन येथून (खापरी-आटोमोटिव्ह चौक,लोकमान्य नगर-प्रजापती नगर मेट्रो स्टेशन) पासून महा मेट्रोची मेट्रो सेवा नागारिकांकरिता सुरु होईल. यशवंत स्टेडियम येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com