यवतमाळ पाणीपुरवठा योजनेच्या कार्यान्वयनासाठी लवकरच बैठक – मंत्री उदय सामंत

नागपूर : यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारी ३०० कोटी रुपये खर्चाची योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली महिनाभरात बैठकीचे आयोजन करून निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी आज विधान सभेत सांगितले.

सदस्य सुभाष धोटे यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता.

मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, यवतमाळ पाणीपुरवठा योजनेकरीता मुख्य जलकेंद्र बेंबळा व जलशुद्धीकरण केंद्र टाकळी येथील पंपिंग मशीनकरीता ३३ केव्ही एक्स्प्रेस फिडरच्या उभारणीसाठी प्रसिद्ध केलेल्या निविदेतील पूर्व अर्हतेच्या अटींच्या अधीन राहून तीन निविदा पात्र ठरल्या होत्या. त्यापैकी मे. कोमल इलेक्ट्रीक सर्व्हिसेस, यवतमाळ व मोरया इलेक्ट्रीक, पुसद यांनी सादर केलेले अनुभव प्रमाणपत्र बनावट व चुकीचे असल्याची तक्रार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे प्राप्त झाली होती. या निविदाधारकांनी सादर केलेले प्रमाणपत्र हे महावितरण कंपनीचे असल्याने त्यांच्याकडून याबाबत शहानिशा करण्यात आली असून महावितरणने सदरचे अनुभव प्रमाणपत्र योग्य असल्याचे स्पष्ट केले, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, यवतमाळ यांनी कळविले होते.

याबाबत आर्थिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास सादर केलेल्या पत्रानुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, यवतमाळ यांच्या आदेशान्वये गुन्हा नोंद केला असून तपास सुरू आहे. तसेच प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी अधीक्षक अभियंत्यांनी कार्यकारी अभियत्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केली होती. मात्र, अधीक्षक अभियंत्यांनी हा अहवाल स्वीकारला नाही. त्यामुळे मुख्य अभियंत्यांनी हस्तक्षेप केला. या प्रमाणपत्र प्रकरणी वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांची चौकशी सुरू असून त्यांची बदली करण्यात आली आहे. तसेच अधीक्षक अभियंत्यांचीही चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी दोषी असलेल्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री नाना पटोले, मदन येरावर आदींनी सहभाग घेतला.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com