मराठी भाषा गौरव दिन

मराठी भाषेच्या विकासासाठी प्रशासन प्रयत्नशील -जिल्हाधिकारी आर. विमला

 महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी सदस्य आशुतोष अडोणी यांचे व्याख्यान

 नागपूर : मराठी भाषेचा सर्वांगिण विकास होण्यासाठी मराठी भाषेतील साहित्यासंदर्भात येणाऱ्या पिढीला माहिती करुन द्यावी. प्रशासनात मराठी भाषेचा व्यापक प्रमाणात वापर होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केला जाईल, असे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आज येथे सांगितले.

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचतभवन सभागृहात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी सदस्य आशुतोष अडोणी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती सुजाता गंधे, विभागीय भाषा सहायक संचालक हरिश सुर्यवंशी, अधीक्षक निलेश काळे आदी उपस्थित होते.

            श्रीमती विमला म्हणाल्या की, मराठी भाषेला मोठा इतिहास आहे. पूर्वीच्या काळातील संतांच्या अभंगातून, वाङमयातून मराठी भाषेचा विकास झाल्याने आता ती समृध्द आहे. भाषेचे जेवढे अधिक ज्ञान तेवढे व्यक्तिमत्वात भर पडते. इतर दुजाभाव न करता प्रत्येकाने आपल्या मातृभाषेलाही तेवढेच महत्व देऊन ती परिपूर्ण आत्मसात करुन त्यातच संवाद करावा. यामुळे मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होऊन विकास होईल. प्रशासनात व दैनंदिन व्यवहारात सुध्दा मोठ्या प्रमाणात मराठी भाषेचा वापर करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            या कार्यक्रमात श्री. अडोणी यांनी मराठी भाषेचा इतिहास, मराठी भाषेतील वाङमय व साहित्य संदर्भात सविस्तर व्याख्यान दिले. ते म्हणाले की, मानवाच्या उत्त्पतीनंतर भाषा ही संवाद साधण्यासाठी गरज ठरली आणि त्यातूनच भाषेची निर्मिती झाली. मराठी ही फक्त भाषा नसून जीवन जगण्याची प्रक्रिया आहे. बाळाचा जन्म झाल्यावर आईच प्रथमत: मुलाला जीवनाचे तत्वज्ञान खूप सोपे करुन सांगत असते, ते तत्वज्ञान जगातील प्रत्येक आईच्या मातृभाषेत समजावून सांगते. त्यामुळेच मराठीला आपण ‘माय मराठी’ म्हणून संबोधतो. छप्पन बोली भाषा एकत्र होऊन माय मराठी निर्माण झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

            प्रत्येकाने मराठी भाषेचे महत्व समजून घेणे आवश्यक आहे. मानवी संवेदनांना चालना देण्याचे काम मराठी भाषेत आहे. भाषेची जेव्हा नाळ तुटते तेव्हा संवाद विस्कळीत होतो. आताच्या युगात भाषेची नाळ तुटल्याने लोकांच्या संवेदना बोथट झाल्या आहेत. मराठी भाषेचे संवर्धन व संस्कार होण्यासाठी येणाऱ्या पिढीला संतांचे व महान व्यक्तींचे साहित्य वाचायला द्यावे. जेव्हा भाषा मजबूत होते तेव्हा राष्ट्र निर्माण होते. भाषा ही राष्ट्राला उभी करीत असते. त्यामुळे सर्वांनी मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी मराठीचा जास्तीत जास्त वापर करावा. स्वत:च्या स्वाक्षरीसह प्रशासकीय व इतर व्यवहारिक कामकाज मराठीतूनच करण्याचा संकल्प करुया तेव्हाच मराठी ही व्यापक अभिव्यक्तीची भाषा होईल, असे श्री. अडोणी यांनी यावेळी सांगितले.

            कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्त राज्यात सर्वत्र भाषा संचालनालयाव्दारे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणून दर्जा मिळण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. 1964 मध्ये मराठी भाषेचा प्रशासनात वापर करण्यासाठी अधिनियम जारी करण्यात आला. मराठी भाषेचा व शब्दांचा प्रचार व प्रसार होण्यासाठी भाषा संचालनालयाव्दारे विविध उपक्रम राबविले जातात. विभागाव्दारे 40 शब्दावल्यांची निर्मिती करण्यात आली आहे तसेच विविध मराठी भाषा प्रकाशने केली जातात, अशी माहिती विभागीय सहायक संचालक श्री. सुर्यवंशी यांनी यावेळी दिली.

             कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रुपाली खाडे यांनी केले तर उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कराडच्या ३२ शिक्षकांची चंद्रपूर मनपाच्या शाळांना भेट

Tue Mar 1 , 2022
चंद्रपूर – कोरोनाच्या काळात ऑनलाईन शिक्षणाची सोय करून पटसंख्या वाढविणाऱ्या चंद्रपूर महापालिकेच्या शाळा आदर्श ठरू लागल्या आहेत. हा उपक्रमशील प्रयोग बघण्यासाठी कराड येथील शिक्षकाचे एक शिष्टमंडळ २८ फेब्रुवारी रोजी चंद्रपूर शहरात आले होते. कराड नगर परीषद शाळा क्रमांक ३ येथील प्रयोगशील मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांच्या नेतृत्वात ३२ शिक्षक- शिक्षिकानी चंद्रपूर महानगरपालिकेच्या भिवापूर, बाबुपेठ आणि अष्टभुजा येथील शाळा भेटी दिल्या. चंद्रपूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com