संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 15 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राज रॉयल लॉन जवळील ऑरेंज सिटी टाऊनशीप जवळील ओपन गटार मध्ये पायी जात असलेला एक 55 वर्षीय इसम पडल्याची घटना 13 मार्च ला दुपारी दीड दरम्यान घडली असता गटारीत पडलेल्या इसमाच्या नाका तोंडात पाणी शिरल्याने गुदमरून मृत्यू झाला असून मृतक इसमाचे नाव विलास गोपीचंद चव्हाण वय 55 वर्षे रा एडिफाय स्कुल जवळ खैरी कामठी असे आहे.
सदर मृतक हा मूळचा तुमसर तालुक्यातील गोबरवाही गावाचा रहिवासी आहे.रोजगारासाठी काही महिन्यांपूर्वी कामठी येथील स्कुल ऑफ एडिफाय जवळ राहून खाजगी कामे करीत होता.दरम्यान 13 मार्च ला सदर घटनास्थळ मार्गे पायी पायी जात असता अचानक तोल गेल्याने सदर मृतक इसम खुल्या दलदल असलेल्या गटारीत पडला असता शेजारील मंडळींनी मदतीची धाव घेत बचाव करण्याचा प्रयत्न केला.मात्र त्याच्या नाकातोंडात गटारीचे पाणी शिरल्याने जीव गुदमरून गेला होता .उपचारार्थ इस्पितळात हलविण्यात आले मात्र तोवर पोलिसांनी मृत घोषित केले होते.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद करीत मृतकाच्या पार्थिवावर नागपूर च्या मेडिकल शवविच्छेदनगृहात शवविच्छेदन करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.