राष्ट्रीय महासचिव, राज्याचे प्रभारी मा.खासदार डॉ.अशोक सिद्धार्थ यांचे आवाहन
मुंबई – सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याच्या कामाचा विसर सध्यस्थितीत महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांना पडला आहे. नागरिकांच्या प्रश्नांवरून लक्ष भरकटवण्यासाठी किरकोळ मुद्दे, वैयक्तिक टीका नालस्ती करण्यात कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप सह सर्वच राजकीय पक्ष धन्यता मानत आहेत. एकमेव बहुजन समाज पार्टी याला अपवाद आहे.सर्वसामान्यांसाठींच्या पक्षाची राज्यातील राजकारणात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासह समाजातील पीडित, शोषित, उपेक्षितांचा आवाज बुलंद करण्याकरीता ‘बसपा’मय वातावरण निर्माण करा, असे आवाहन बसपाचे राष्ट्रीय महासचिव, प्रदेश प्रभारी खासदार डॉ.अशोक सिद्धार्थ यांनी केले आहे. चेंबुर येथील बसपा भवन येथे आयोजित राज्य कार्यकारिणीच्या बैठकीतून त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांना संबोधित केले. महाराष्ट्रातील शेवटच्या मतदारपर्यंत ‘बसपा’ची विचारधारा पोहचवण्याचे आवाहन देखील यानिमित्ताने त्यांनी केले.
बैठकीत मा.अशोक सिद्धार्थ साहेब यांच्यासह माजी मंत्री धर्मवीर सिंह अशोक साहेब, प्रदेश प्रभारी प्रमोद रैना साहेब आणि प्रदेश अध्यक्ष अँड.संदीप ताजने साहेब प्रामुख्याने उपस्थित होते. महाराष्ट्रात युवकांना योग्य प्रमाणात भागीदारी देण्याचे काम बसपा करणार आहे. तरूण नेतृत्वाला योग्य प्रतिनिधित्व देण्याचे निर्देश सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जुन्याजाणत्या नेत्यांची मोट बांधून त्यांचा अनुभव आणि मार्गदर्शनाखाली बसपा राज्यात संघटन बांधणी करेल, असे प्रतिपादन प्रदेश प्रभारी माजी मंत्री मा.धर्मवीर सिंह अशोक साहेब यांनी केले. संघटन बांधणी आणि पक्षाच्या वैचारिकतेला समर्पित कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल असे सांगत त्यांनी पार्टीतील निष्क्रिय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना इशारा दिला.
बैठकीतून राज्यात बसपाची संघटनबांधणी तसेच राजकीय स्थितीसंबंधी विचारमंथन करण्यात आले.राज्य कार्यकारिणीच्या सुरूवातील बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तसेच उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मा.बहन कुमारी मायावजी जी यांच्या पूज्य आई श्रीमती रामरतीजी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीत प्रदेश कोषाध्यक्ष, महासचिव, प्रदेश सचिव, जिल्हा प्रभारी, जिल्हा अध्यक्ष तसेच इतर पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्तेच बसपाचे ऊर्जास्त्रोत-रैना
राज्यातील कार्यकर्तेच बसपाचे ऊर्जास्त्रोत आहेत. पक्षबांधणीसह संघटन विस्तार आणि बसपाचे विचार घरोघरी पोहचवण्याचे काम करणाऱ्या कॅडरच्या विश्वासच राज्यात बसपाला सत्तारूढ करेल, असे प्रतिपादन प्रदेश प्रभारी प्रमोद रैना साहेब यांनी केले. राज्यात बसपाच्या संवाद यात्रेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. गावोगाव, खेड्यापाड्यात बसपाची रचना सक्रिय झाली आहे. येत्या काळात राज्यात होवू घातलेल्या महानगर पालिकेच्या निवडणुकीत बसपाची ताकद इतर राजकीय पक्षांना दिसून येईल, असे रैना म्हणाले.
सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देवू-अँड.ताजने
महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना केंद्र आणि राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे दर नागरिकांच्या आवाक्याबाहेर पोहचले आहे. पंरतु, राज्यात सत्ताधारी आणि विरोधक केवळ राजकीय चिखलफेकीतच व्यस्त आहेत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडून हेतुपुरस्सर लक्ष वेधण्याचे काम सत्ताधारी करीत असल्याचा आरोप बसपाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी केला. सत्ताधारी आणि त्यांना साथ देणाऱ्या विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवण्याचे महत्वाचे कार्य त्यामुळे सर्वसामान्य मतदारांना करावे लागणार आहे. राज्याच्या राजकारणात नवा पर्याय बसपाने दिला आहे. बसपा आता सत्तेच्या दिशेने मार्गक्रमण करीत असल्याचे अँड.ताजने म्हणाले.