स्वमुल्यांकन करीत ‘स्वच्छ मोहल्ला’ स्पर्धा यशस्वी करा – स्पर्धकांना अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांचे आवाहन

नागपूर :- स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आणि नागपूर@२०२५ या संस्थेच्या सहकार्याने ‘स्वच्छ मोहल्ला’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत सुमारे ५०० मोहल्ल्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला असून, स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी स्वमूल्यांकन करीत स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले.

स्वमूल्यांकनासंदर्भात माहिती देत राम जोशी यांनी सांगिलते की, स्वच्छ मोहल्ला स्पर्धेत सहभागी सर्व मोहल्ल्यांनी स्वतःच्या कार्याचे स्वमुल्यांकन करायचे आहे. याकरीत नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोन मध्ये स्पर्धेचा स्वमुल्यांकन अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्पर्धकांनी स्वतःच्या कार्याचा आढावा घेत स्वमुल्यांकन अर्ज लवकरात लवकर संबंधित झोन कार्यालयाला सुपूर्द करावा. प्राप्त झालेल्या अर्जानुसार स्वतंत्र यंत्रणेकडून मोहल्ल्यांचे परीक्षण करण्यात येईल. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी यावेळी दिली.

स्वच्छ सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वत:, स्वत:चे घर आणि आपला मोहल्ला असे स्वच्छतेचे पाऊल टाकावे. असे केल्यास आपल्या शहराचा चेहरामोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही. असेही जोशी यावेळी म्हणाले.

नागपूर महानगरपालिकेने नागपूर@२०२५ आणि इतर संस्थेच्या सहकार्याने ‘स्वच्छ मोहल्ला’ स्पर्धा आयोजित केली असून, या स्तूत्य उपक्रमाला नागपूर शहरातील दहाही झोनमधून सुमारे ५०० मोहल्ल्यांनी नोंदणी करून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.मनपाच्या दहाही झोनपैकी हनुमान नगर झोनमध्ये सर्वाधिक ५८ मोहल्ल्यांनी तर त्यापाठोपाठ आशीनगर झोनमधील ५७ मोहल्ल्यांनी नोंदणी केली आहे. हनुमान नगर झोनमधील ५८ मोहल्ल्यांमध्ये १५०२४ घरे तर आशीनगर झोनमधील ५७ मोहल्ल्यांमध्ये ११२७५ घरे आहे. यापाठोपाठ गांधीबाग झोनमध्ये ५४ मोहल्ले (७७१९ घरे), लक्ष्मीनगर झोनमध्ये ५३ मोहल्ले (१०६३८ घरे), लकडगंज झोनमधील ५२ मोहल्ले (१२३०४ घरे), नेहरूनगर झोनमधील ४८ मोहल्ले (१२३०० घरे), धंतोली झोनमधील ४५ मोहल्ले (६७९९ घरे), सतरंजीपुरा झोनमधील ४३ मोहल्ले (८६३३ घरे), मंगळवारी झोनमधील ४० मोहल्ले (१२३३९ घरे) आणि धरमपेठ झोनमधील १९ मोहल्ले (१९१२५ घरे) ‘स्वच्छ मोहल्ला’ स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. विशेष म्हणजे, या स्पर्धेद्वारे स्वच्छतेत उत्कृष्ट कार्य करणा-या विजेत्या मोहल्ल्यांना त्यांच्या मोहल्ल्यांमध्ये २५ लाखापर्यंतचे आवश्यक विकास कामे करण्याचे अनोखे पुरस्कार मिळणार आहे.

‘माझा मोहल्ला, माझी शान’ 

स्वच्छ सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ मोहल्ला स्पर्धेत सहभागी मोहल्ल्यांना नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘माझा मोहल्ला, माझी शान’ असे विशेष फलक आणि दिशादर्शक खुण देण्यात येत आहेत. आपल्या मोहल्ल्यात विशेष दर्शनीय भागात हे फलक लावावे असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com