महाविकास आघाडीची वाटचाल विसर्जनाकडे – भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

मुंबई :- सत्तेचा मलिदा चाखण्यासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीला सत्ता गेल्यामुळे घरघर लागली आहे. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांआधी मोठा भाऊ कोण याचे दावे सुरु झाल्याने महाविकास आघाडीची वाटचाल विसर्जनाकडे सुरु झाली आहे , अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यावेळी उपस्थित होते.

उपाध्ये यांनी सांगितले की, केवळ सत्तेसाठीच काँग्रेस , राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. सत्ता गेल्यानंतर या पक्षांमध्ये कलगी तुरा रंगला आहे. ‘राष्ट्रवादी’ ने आघाडीत आपणच मोठा भाऊ असल्याचा दावा केला आहे. अधिकृत पक्षच नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आपल्यामागे किती माणसे आहेत हे न मोजताच लोकसभेच्या १९ जागांवर दावा करू लागले आहेत. कोणत्या आधारावर आपण १९ जागा मागत आहोत हे संजय राऊत यांनी सांगावे , असेही उपाध्ये यांनी नमूद केले.

सत्तेतून गेल्यावर जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी कोणाची ताकद जास्त हे सांगण्यातच आघाडीचे तिन्ही पक्ष आपली ताकद खर्च करत आहेत. एकमेकांच्या आधाराशिवाय आपण टिकू शकत नाही हे या तिन्ही पक्षांना ठाऊक आहे. जिवंत राहण्यासाठी एकमेकांमध्येच स्पर्धा सुरु झाल्याने या आघाडीची वाटचाल विसर्जनाकडे चालू आहे, असेही ते म्हणाले.

उपाध्ये यांनी सांगितले की , पूर्वी एखाद्या सरकारी यंत्रणेने चौकशीसाठी बोलावले की , राजकीय नेत्यांना त्याचा गवगवा होऊ नये असे वाटायचे . मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीला जाताना आपण मोठे शौर्य केल्याचा आविर्भाव आणलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची मानसिकताच यातून स्पष्ट झाली आहे.

NewsToday24x7

Next Post

महाराणा प्रताप यांना विभागीय आयुक्त कार्यालयात अभिवादन

Mon May 22 , 2023
नागपूर :- महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला उपायुक्त दीपाली मोतीयेळे, धनश्याम भूगावकर, सहायक संचालक शंकर बळी, नायब तहसिलदार आर.के.डिघोळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com