भारतपर्व महोत्सवात असणार महाराष्ट्राचा ‘मधाचे गाव’ संकल्पनेवर आधारित चित्ररथ

नवी दिल्ली :- लाल किल्ला परिसरात भारत पर्व महोत्सवाचे आयोजन प्रजासत्ताक दिनानिमित्त होणार असून या ठिकाणी महाराष्ट्रा राज्याचा ‘मधाचे गाव’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ असणार आहे.

दरवर्षी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने लाल किल्ला येथे भारतपर्व महोत्सवाचे आयोजन प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानिमित्त केले जाते. यावर्षी या महोत्सवात महाराष्ट्राचा चित्ररथ दर्शविण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह बारा राज्यातील चित्ररथ ही इथे असणार आहेत. दिनांक 26 ते 29 जानेवारी दरम्यान भारतपर्व महोत्सव चालेल.

हे वर्ष संविधानाचे अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरे केले जात असून, यावर्षी चित्ररथांसाठी ‘सुवर्ण भारत: वारसा आणि विकास’ ही मध्यवर्ती संकल्पना आहे. या संकल्पने च्या आधारावर महाराष्ट्र राज्याने ‘मधाचे गाव’ असा चित्ररथ तयार केला.

मध माशांचे पर्यावरणाच्या आणि मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. मधाचे व्यावसायिक महत्त्व लक्षात घेऊन, स्थानिक रोजगार निर्मिती आणि उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने 2022 मध्ये ‘मधाचे गाव’ ही योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश स्थानिक रोजगार निर्मिती करणे आणि गावे आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा आहे. त्याचबरोबर पर्यटन व पर्यावरण यासाठीही ही योजना महत्त्वाची आहे.

असा असेल ‘मधाचे गाव’ चित्ररथ

चित्ररथाच्या पुढच्या भागात फुलांनी सजवेलेली मधमाशीचे आकर्षक शिल्प बसवले आहे. या मधमाशीभोवती लहान मधमाशा आणि काही फुले दाखवली आहेत. भव्य मधमाशीच्या पंखांची हालचाल दाखवण्यात आली असून लहान मधमाशा हवेत उडताना दिसतील.

चित्ररथाच्या मागील भागात एक विशाल मधमाशाचे पोळ चित्रित करण्यात आले आहेत. नैसर्गिकरित्या असणा-या मधुमाशींच्या पोळची अचूक प्रतिकृती बनविली आहे. मधमाश्या त्यांच्याभोवती फिरताना दिसतात. मध उत्पादनाचे टप्पे मोठ्या मधाच्या पोळ जवळ दाखवले आहेत. मध व्यवसायातील महत्त्वपूर्ण उप-उत्पादने देखील दर्शविली आहेत. फुलांच्या परागीकरणातून रस शोषुण घेणा-या मधमाशी प्रतिकृती दर्शविण्यात आली आहे. मध निर्मितीच्या विविध टप्प्यातील प्रक्रिया दर्शविण्यात आले आहेत. मधमाशीपालनात वापरल्या जाणाऱ्या खोक्यांवर मधाचे गाव योजनेत समाविष्ट असलेल्या काही गावांची नावे लिहिली आहेत.

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनातून सदरील चित्ररथ तयार झाल्याची माहिती सांस्कृतिक विभागाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

प्रा. स्वप्नील धनराज अंबादे यांना पीएच.डी.

Thu Jan 23 , 2025
नागपूर :- शासकीय तंत्रनिकेतन, नागपूर येथील अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक स्वप्नील धनराज अंबादे यांना अमरावती मधील जी. एच. रायसोनी विद्यापीठाने पीएच.डी पदवी प्रदान केली आहे. “आय ओ टी बेस्ड लोव कॉस्ट फरटीलायझर एन्ड इर्रीगेशन मोनिटरिंग सिस्टिम फॉर कॉटन क्रॉप फिल्ड”( IoT based low cost Fertilization and Irrigation Monitoring System for Cotton Crop-Field) हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्यांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!