नवी दिल्ली :- महाराष्ट्र शासनाने कामगार संहितेनुसार नियमावली तयार केलेली आहे. मार्चमध्ये होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात ही नियमावली मांडण्यात येणार असल्याची, माहिती राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी कामगार मंत्र्याच्या बैठकीत दिली.
येथील अशोका हॉटेलमध्ये काल आणि आज केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेत सर्व राज्यांच्या कामगार मंत्र्यांची दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी फुंडकर बोलत होते. या बैठकीस केंद्रीय कामगार मंत्री यांच्यासह केंद्रीय राज्य मंत्री शोभा कंरदलाजे, केंद्रीय कामगार विभागाच्या सचिव तसेच विविध राज्यांचे कामगार मंत्री आणि सचिव उपस्थित होते. राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर उपस्थित होते. तसेच कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय ए कुंदन , रोजगार राज्य विमा योजनाचे आयुक्त आस्तिक कुमार पांडे उपस्थित होते.
राज्याचे कामगार मंत्री फुंडकर यांनी संघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) या विषयावरील महत्त्वपूर्ण सत्राची सहअध्यक्षता केली. अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री मांडविया होते. यावेळी त्यांनी सांगितले, कामगार संहितांनुसार नियमावली तयार केली असून फेब्रुवारी २०२५ च्या अखेरीस राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ही नियमावली मांडली जाईल असून मार्चमध्ये होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात ही नियमावली सादर केली जाईल, अशी माहिती फुंडकर यांनी दिली.
ईएसआयसीसंदर्भात, फुंडकर यांनी ईएसआयसी आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना संलग्न करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले. ईएसआयसी अंतर्गत अधिक लोकांना लाभ देण्यासाठी त्याचे कार्यक्षेत्र वाढविणे, आरोग्यसेवेचे फायदे सुधारणे आणि धोरणात्मक सुधारणांची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यावर ही फुंडकर यांनी भर दिला यासाठी केंद्राकडून मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा ही व्यक्त केली.
कामगार मंत्री फुंडकर यांनी ही परिषद आयोजित केल्याबद्दल केंद्राचे आभार मानले. यामुळे केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय आणि संवादाची संस्कृती वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भविष्यात महाराष्ट्रात असा कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छाही फुंडकर यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन यांनी औद्योगिक न्यायाधिकरण स्थापन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी केंद्राचे सहकार्य मागितले. उद्योगातील कुशल मनुष्यबळाची मागणी आणि पुरवठ्यातील तफावत भरून काढण्यासाठी अधकि प्रशिक्षण संस्थेची आवश्यकता असल्याचे माहिती दिली.
कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी राज्यात ईएसआयसीच्यावतीने सुरू असलेल्या योजनांची आणि आरोग्य सेवांची माहितीचे संगणकीकृत सादरीकरण केले. राज्य शासनाने कामगार विमा सोसायटी तयार असल्याची माहिती दिली.