– उद्योग व्यवसाय उभारणीसाठी संपर्क साधण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
नागपूर :- केवळ मराठा समाजातील युवकांना व्यवसाय उद्योग उभारणीसाठी निर्माण करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत नागपूर जिल्ह्यामध्ये सात कोटींचे कर्ज आतापर्यंत वाटप करण्यात आले आहे. 112 व्यक्तींना आपले उद्योग व्यवसाय उभे करण्यासाठी यातून मदत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मराठा समाजातील तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सिव्हिल लाईन परिसरातील प्रशासकीय भवन क्रमांक २ मध्ये दुसऱ्या मळ्यावर कौशल्य विकास विभागामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कार्यालय आहे. या ठिकाणी या योजनेतून लाभ मिळवून देण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून समन्वय अधिकारी म्हणून प्रियंका कपले कार्यरत आहेत. या ठिकाणी योजनेसंदर्भातील सर्व माहिती दिली जाते ही योजना पूर्णतः ऑनलाइन आहे. विशेष म्हणजे ज्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यासाठी शासन पाठपुरावा करते. तसेच व्याजाचे हप्ते सुद्धा शासन भरते. त्यामुळे मोठ्या संख्येने मराठा समाजातील युवकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्या योजनांचा लाभ मिळतो ?
मराठा समाजातील युवकांना उद्योजक करण्यासाठी या महामंडळामार्फत विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये १. )१५ लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना ( आयआर -1 ) 2. ) 25 लाखांवरील गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना (महत्तम 50 लाखापर्यंत मर्यादा) या दोन प्रमुख योजनांचा समावेश आहे.
महामंडळाच्या योजनांची संपूर्ण यंत्रणा व कार्यपद्धती ही ऑनलाईन असून पूर्णपणे पारदर्शक आहे. लाभार्थीभिमुख ही योजना असून याची माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. उद्योग डॉट महास्वयम डॉट जीओव्ही डॉट इन या वेबप्रणालीवर कर्जासंदर्भातील माहिती अपलोड करणे आवश्यक आहे. संपूर्णतः ही प्रक्रिया ऑनलाइन आहे.
कोणाला मिळतो लाभ ?
या दोन्ही योजनेकरिता उमेदवार महाराष्ट्रातील व मराठा प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. व्यवसायासाठी वयाची मर्यादा साठ वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या आत असणे आवश्यक आहे. या योजनेतून व्यवसाय उद्योगाकरिता घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा शासनामार्फत करण्यात येते. थोडक्यात शासन घेतलेल्या रकमेवरील व्याज बँकेला परत करते.
1. व्यक्तिगत कर्ज व्याज परतावा योजना
या योजनेमध्ये 15 लाखापर्यंत कर्ज दिल्या जाते. महामंडळामार्फत 4.5 लाखाच्या व्याज मर्यादित परतावा करण्यात येतो. लाभार्थ्याने कर्ज व्यावसायिक तथा उद्योगाच्या दृष्टीने घेतलेले असावे कर्ज बँकेमार्फतच घेतले असावे.
2. गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना
या योजनेअंतर्गत किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकत्रित येऊन व्यवसाय करणे अपेक्षित आहे. दोन व्यक्तींसाठी कमाल 25 लाखांच्या मर्यादेवर, तीन व्यक्तींसाठी 35 लाखांच्या मर्यादेवर, चार व्यक्तींसाठी 45 लाखांच्या मर्यादेवर, पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास 50 लाखापर्यंतच्या व्यवसाय -उद्योग कर्ज देण्यात येते.पाच वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते.जास्तीत जास्त 12 टक्के व्याज किंवा रुपये 15 लाखाच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दर महामंडळामार्फत जमा करण्यात येते.
कसे मिळवायचे कर्ज ?
मराठा समाजातील व्यक्तींना किंवा व्यक्तींच्या गटांना या दोन्ही योजनेतून कर्ज मिळवण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे.कर्ज मिळवण्यासाठी पात्रता कागदपत्रे आवश्यक आहे.यामध्ये स्वतःच्या ईमेल आयडीसह मोबाईल क्रमांक अपडेट असणारे आधार कार्ड, रहिवासी पुरावा उत्पन्नाचा पुरावा जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला एक पानी प्रकल्प अहवाल आवश्यक आहे. या योजने संदर्भातील सर्व माहिती देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे नागपूर जिल्ह्यासाठी कौशल्य विकास विभागात 0712-2531213 या क्रमांकावर संपर्क साधून माहिती मिळवता येईल. नागपूर जिल्ह्यासाठी प्रियंका कपले या समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.