– विश्वकर्मा जयंतीनिमित्त कार्यक्रम
नागपूर :- भगवान विश्वकर्मा यांनी विश्वाची निर्मिती केली तेव्हा स्मार्ट सिटी, स्मार्ट व्हिलेज अशा संकल्पना नसतीलही; मात्र आदर्श जीवनाची संकल्पना त्यांनी मांडली. आपण तशा जीवनाचा संकल्प आजच्या दिवशी करुया, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) केले.
विश्वकर्मा युवक समाज, विश्वकर्मा देवस्थान पंच कमेटी आणि विश्वकर्मा महिला संघटन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री विश्वकर्मा जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संत जगनाडे चौक येथील श्री गायत्री परिवार ट्रस्ट सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला ना. नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ना. गडकरी म्हणाले, ‘भगवान विश्वकर्मा यांनी वसुधैव कुटुम्बकम् ही संकल्पना मांडली. संपूर्ण विश्वाचे कल्याण व्हावे, हा संदेश देऊन त्यांनी विश्वाची निर्मिती केली. त्यांनी दिलेल्या मूल्यांवर आपण चालण्याची आज गरज आहे. चांगले शिक्षण, चांगले आरोग्य, स्वच्छतेसाठी सदैव तत्पर असले पाहिजे. अगदी शहरातील रस्त्यांवर एखादे झाड वाळत असेल तर ते वाचविण्याकरितापाणी टाकण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आपले शहर, आपला देश आणि आपले विश्व सुंदर असले तर तेच भगवान विश्वकर्मा यांना खरे अभिवादन असेल.’ श्री विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या समाजबांधवांना त्यांनी जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येक जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन ना. गडकरी यांनी केले.