इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सचे मोठे जाळे; आता ‘नो टेन्शन’

नागपूर :- पेट्रोल, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे त्रस्त झालेल्या वाहनधारकांसाठी इलेक्ट्रिक वाहने एक उत्तम पर्याय ठरली आहेत. सुरुवातीला या वाहनांना ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी, मागील तीन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन, महावितरणचे नागपूर परिमंडलातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सचे जाळे वेगाने विस्तारत आहे. आता नागपूर जिल्ह्यात तब्बल 118, तर वर्धा जिल्ह्यात 22 ठिकाणी ई-चार्जिंगची सोय उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

घरगुती विजेवर दुचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रिक वाहने चार्ज करता येत असली तरी, आता ई-चार्जिंग स्टेशन्समुळे कमी वेळेत जलद चार्जिंगची सुविधा उपलब्ध झाली आहे. लांबच्या प्रवासासाठी ही सोय अत्यंत उपयुक्त ठरत आहे. एकदा चार्जिंग केल्यावर ठराविक किलोमीटरपर्यंत धावणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग कधी संपेल याची चिंता वाहनचालकांना नेहमी सतावत असते. मात्र, आता चार्जिंग स्टेशन्सचे विस्तृत जाळे तयार झाल्यामुळे ही भीती दूर होत आहे.

महावितरणची महत्त्वपूर्ण भूमिका:

राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा पुरवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) ला ‘नोडल एजन्सी’ म्हणून नियुक्त केले आहे. यासाठी राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण देखील जाहीर केले आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक यांसारखी सहा मोठी शहरे प्रदूषित मानली जातात. या शहरांमध्ये मागणीनुसार ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनसाठी वीज जोडणी प्राधान्याने दिली जात आहे. महावितरण यासाठी तांत्रिक सहाय्य पुरवण्यासाठी नेहमीच तत्पर आहे. नागपूर परिमंडलात इलेक्ट्रिक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता, ई-चार्जिंग स्टेशन्सची संख्या झपाट्याने वाढत आहे.

महावितरण महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंग सुविधा पुरवणारी प्रमुख संस्था आहे. या अंतर्गत, महावितरण स्वतः चार्जिंग स्टेशन्स उभारणे किंवा खासगी चार्जिंग स्टेशन उभारणीस मदत करणे, इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी उपयुक्त मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करणे आणि इलेक्ट्रिक वाहनांसंबंधी धोरणात्मक निर्णयात सरकारला मदत करणे यांसारखी विविध कामे करते. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी स्टेशन सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी महावितरणने स्वतंत्र वेबसाईट सुरू केली आहे. यासोबतच, महावितरणच्या ‘पॉवरअप ईव्ही’ या मोबाईल ॲपच्या माध्यमातून वाहनचालक त्यांच्या जवळचे चार्जिंग स्टेशन सहजपणे शोधू शकतात आणि चार्जिंगसाठी या ॲपचा वापर करू शकतात.

परिमंडलातील चार्जिंग स्टेशन्सची विभागणी:

नागपूर जिल्ह्यातील 118 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्सपैकी कळमेश्वर येथे 1, कामठी येथे 4, कन्हान, कोंढाळी, रामटेक आणि सावनेर येथे प्रत्येकी 3, खापरखेडा आणि मौदा येथे प्रत्येकी 5 स्टेशन्स आहेत. बुटीबोरी आणि एमआयडीसी भागात प्रत्येकी 9, तुळशीबाग येथे 10, हिंगणा, इतवारी आणि मानेवाडा येथे प्रत्येकी 1, सिव्हिल लाईन्स, हुडकेश्वर, त्रिमुर्तीनगर आणि वर्धमाननगर येथे प्रत्येकी 7, लष्करीबाग आणि नंदनवन येथे प्रत्येकी 3, रिजंट उपविभागात 11 आणि शंकरनगर उपविभाग भागात 6 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उपलब्ध आहेत.

याव्यतिरिक्त, वर्धा जिल्ह्यातील 22 चार्जिंग स्टेशन्सपैकी आर्वी उपविभाग परिसरात 2, आष्टी, देवळी, सेलू येथे प्रत्येकी 1, हिंगणघाट येथे 3, कारंजा आणि समुद्रपूर येथे प्रत्येकी 4 तर वर्धा भागात 6 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स कार्यरत आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी आवश्यक असणारी सर्वंकष सुविधा महावितरणतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. खासगी कंपन्या, पेट्रोलियम कंपन्या, सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स, सार्वजनिक परिवहन सेवा, निवासी संकुल आणि वैयक्तिक ग्राहकदेखील इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करू शकतात आणि यासाठी लागणारी तांत्रिक मदत महावितरणकडून पुरवली जाईल, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राज्याच्या आरोग्य धोरणाबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

Mon May 19 , 2025
मुंबई :- सार्वजनिक आरोग्य विभाग अधिक गतिमान, लोकाभिमुख व पारदर्शी करण्याच्या दृष्टीने राज्याच्या आरोग्य धोरणाबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य भवन येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत दिले. आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस आरोग्य सचिव डॉ.निपुण विनायक, सचिव विरेंद्र सिंह, आयुक्त अमगोथू श्रीरंगा नायक, संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, संचालक विजय कंदेवाड, संचालक डॉ.स्वप्नील लाळे यांचेसह […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!