कोल्हापूर चित्रनगरीचा कायापालट करण्यात येणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : कोल्हापूर चित्रनगरीत मालिका तसेच चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्याबरोबरच येत्या काळात चित्रनगरीचा कायापालट करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य रोहित पवार, हरिभाऊ बागडे, हसन मुश्रीफ, दीपक चव्हाण यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनेद्वारे कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययातव सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, येत्या काळात कोल्हापूरात 78 एकर परिसरात असलेल्या चित्रनगरीत चित्रीकरणासाठी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देताना येथे उभारण्यात आलेले चित्रीकरणाचे सेट पर्यटकांचे आकर्षण ठरतील. सध्या मोठया प्रमाणावर येथे आधुनिकीकरणाची कामे हाती घेण्यात येत असल्याने रोजगार आणि महसूल निर्माण होण्यास मदत होत आहे.

कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक 18 जानेवारी 2023 रेाजी घेण्यात आली. या बैठकीत कोल्हापूर चित्रनगरीत रेल्वे स्थानकाचा तसेच रेल्वे स्थानकाच्या एका बाजूस शहर आणि एका बाजूस गाव वस्तीचा देखावा तयार करणे, कोल्हापूर चित्रनगरीच्या मुख्य प्रवेशद्वाराचे सुशोभिकरण करणे, कोल्हापूर चित्रनगरी येथे रस्ते तयार करण्याबरोबरच पथदिवे बसविणे, तसेच येथील संपूर्ण परिसरात पाणी पुरवठयासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक 4 ते चित्रनगरीपर्यंत 100 मि.मि. व्यासाची जलवाहिनी टाकणे आणि पाण्याची टाकी बांधणे, टॉक शो स्टुडिओकरिता ध्वनी प्रतिबंध आणि अग्निशमन योजना करणे, येथे सोलर यंत्रणा बसविणे असे निर्णय घेण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज तसेच राष्ट्रपुरुष, समाजसुधारक यांच्या कार्यावर तयार करण्यात आलेल्या चित्रपटांना यापूर्वी 50 लाख रुपये अनुदान देण्यात येत होते हे अनुदान आता 1 कोटी रुपयांपर्यंत देण्यात येणार आहे. तसेच मालिका आणि चित्रपट यांनाही हे देण्यात येईल. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आपली संस्कृती जतन, संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगले कन्टेंट यावे यासाठी 5 तज्ज्ञ लोकांची समिती नुकतीच करण्यात आली आहे. याशिवाय मराठीत दर्जेदार चित्रपट निर्मिती करणाऱ्यांना राज्य शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या अनुदानाचे वाटप नुकतेच करण्यात आले असून 41 मराठी चित्रपटांना अनुदान देण्यात आल्याचे, सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

NewsToday24x7

Next Post

आरोग्य सेविकांची दोन महिन्यांत भरती - वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन

Sat Mar 11 , 2023
मुंबई : गेल्या तीन वर्षांपासून आरोग्य सेविकांची भरती झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र येत्या दोन महिन्याच्या आत ही भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. विधानसभा सदस्य रवी राणा, वैभव नाईक, मनीषा चौधरी यांनी आरोग्य सेविकांची पदभरतीबाबचा प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, भरती प्रक्रियेसाठी निवडण्यात आलेल्या संस्थेमार्फत अर्ज छाननी प्रक्रिया […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com