-एटापल्लीची युवती चुकून, पण पहिल्यांदाच आली नागपुरात
नागपूर :-बर्याच दिवसानी ती घरी जाणार असल्याचा आनंद तिच्या चेहर्यावर झळकत होता. मात्र, हा आनंद फार वेळ टिकू शकला नाही. कारण तिला उतरायचे होते, बल्लारशाहला मात्र, रेल्वे विषयी काहीच कळत नसल्याने ती बर्याच लांब निघाली. बराच वेळ होवूनही बल्लारशा येत नसल्याने तिच्या जीवाची घालमेल सुरू झाली. भेदरलेला चेहरा, चिंतेचे सावट आणि गोंधळलेली स्थिती होती. मात्र, पोलिसांना पाहताच तिच्या जीवात जीव आला. लोहमार्ग पोलिसांनी तिला भावाच्या सुपूर्द केले. चिंतेचे सावट निर्माण करणारा बल्लारशाह ते नागपूर प्रवास बिलासपूर एक्सप्रेसमध्ये घडला.
एटापल्ली येथील रहिवासी कमला (25)अशिक्षित आहे. ती रेणूगुंटा येथे वीट भट्ट्यावर काम करते. तिला आई वडिल नाहीत, तिचा सांभाळ काका करतात. चुकून ती नागपुरात आली. उपराजधानीत येण्याची तिची पहिलीच वेळ. आता पावसाळा सुरू होत असल्याने वीट भट्ट्याचे काम बंद झाले. त्यामुळे ती घरी जाण्यासाठी निघाली. तशी माहिती तिने भावाला दिली. वेळेनुसार तो बल्लारशाह रेल्वे स्थानकावर तिला घ्यायला गेला. मात्र, बिलासपूर एक्सप्रेस आली आणि नागपुरला निघूनही गेली. मात्र, कमला कुठेच दिसली नाही.
चिंतेत पडलेल्या भावाने लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी लगेच अजनी पोलिस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. तसेच सारा प्रकार सांगितला. नागपूर पोलिसांना दुपारी 1 वाजेच्या सुमारास माहिती मिळाली. तिचे छायाचित्र पोलिस ग्रुपवरही पाठविले. लागलीच हेड कॉन्स्टेबल ऑज्वेल थॉमस आणि सहकारी फलाटावर गेले. दुपारी 2.05 वाजता बिलासपूर एक्सप्रेस आली. पोलिसांनी कमलाचा शोध घेतला आणि पोलिस ठाण्यात आणले. विश्वासात घेवून तिची विचारपूस केली. तसेच तिच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली. दोन तासातच तिचा भाउ ठाण्यात आला. कागदोपत्री कारवाई नंतर कमला भावासोबत घराकडे निघाली.