मार्कंडा मंदिर परिसरातील विकास कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश

– मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची मार्कंडा मंदिरला भेट व पाहणी

गडचिरोली :- जिल्ह्यातील ऐतिहासिक मार्कंडा शिव मंदिर परिसरातील विकास कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले.

सौनिक यांनी मार्कंडा मंदिराला भेट देऊन विकासकामांचा आज आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे, सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन प्रामुख्याने उपस्थित होते.

मुख्य सचिवांनी मंदिर परिसरातील घाट, वाहनतळ, बगीचा यांसारख्या कामांची प्रगती तपासून ती चार महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यांनी मार्कंडा परिसराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून देणारे भव्य स्वरूप देण्याच्या सूचना दिल्या. त्यात जुन्या ऐतिहासिक साक्षीदार प्रवेशद्वाराची उभारणी, शिर्डीच्या धर्तीवर प्रसादालय, बैठक व्यवस्था, पुस्तकालय, प्राचीन माहिती केंद्र यांची उभारणी आणि शेगाव मंदिराप्रमाणे स्वच्छतेचे नियोजन यांचा समावेश करण्याचे सांगितले.

मंदिर परिसरात भाविकांसाठी सुयोग्य रस्ता आणि वाहनतळ उभारणे, भक्तनिवास दुरुस्ती व त्यासाठी ऑनलाइन बुकिंगची पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देशही देण्यात आले. मंदिरालगतचे ग्रामपंचायत कार्यालय स्थलांतरित करण्यासाठी ठराव मंजूर करून स्थानिक ग्रामस्थांची संमती तातडीने मिळवण्यावर भर देण्याचे सांगून त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी व नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकामाल मंजुरी देणे सोयीचे होईल, असेही त्यांनी सांगितले.

पुरातत्त्व विभागाद्वारे मुख्य मंदिराचे सुरू असलेल्या बांधकामांना गती देण्याचे प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मुख्य सचिवांनी या विकास कामांमध्ये विलंब न करता पावसाळ्यापूर्वीच सर्व कामे पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सर्व संबंधित विभागांनी वेळेवर निर्णय घेऊन कामे गतिमान करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी पुरातत्त्व विभाग, सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाचे अधिकारी तसेच मंदिराचे विश्वस्त, पुजारी, सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम

Sat Jan 25 , 2025
मुंबई :- भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम आज छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे झाली. राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव सुनिल सोनार यांनी ध्वजवंदन केले. यावेळी अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) डॉ. निखिल गुप्ता उपस्थित होते. शासनाच्या राजशिष्टाचार विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात भारतीय नौदल, गोवा पोलीस, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!