नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारे अभ्यंकर नगर चौक ते काछीपुरा चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला ‘वॉकेबल स्ट्रीट’ प्रकल्प साकारले जात आहे. या कामांतर्गत अभ्यंकर नगर चौक ते बजाज नगर चौकापर्यंतच्या कामाची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (ता.४) पाहणी केली.
याप्रसंगी अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे, उपअभियंता राजीव गौतम, सहायक अभियंता राजेंद्र जीवतोडे, सीनिअर अर्बन डिझायनर हर्षल बोपर्डीकर, प्रकल्पाचे सल्लागार ओएसिसच्या भाग्यलक्ष्मी बांडे, कंत्राटदार लालवानी आदी उपस्थित होते.
‘वॉकेबल स्ट्रीट’ प्रकल्पाअंतर्गत अभ्यंकर नगर चौक ते काछीपुरा चौकापर्यंत एकूण १.२ किमी रस्त्या लगतचे क्षेत्र विकसीत करण्यात येत आहे. या अंतर्गत रस्त्यालगत पायी चालण्यासाठी मार्ग, सायकल ट्रॅक, प्लाझा, बसण्यासाठी व्यवस्था, सुरक्षा भिंत, पार्कींग अशा सुविधा विकसीत करण्यात येत आहे. प्रकल्पात अभ्यंकर नगर चौक ते बजाज नगर चौकापर्यंत ६०० मीटरचे काम सुरू आहे. या कामाचे आयुक्तांनी निरीक्षण केले.
‘वॉकेबल स्ट्रीट’ प्रकल्पाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू असून त्यात फारशी प्रगती न झाल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. कामातील संथगतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. कामाच्या ठिकाणी असलेले निरुपयोगी बांधकाम साहित्य त्वरीत हटविणे, संपूर्ण परिसरात स्वच्छता ठेवणे तसेच रस्त्यालगत संपूर्ण बॅरिकेटिंग करण्याबाबत त्यांनी कंत्राटदार कंपनीला सक्त निर्देश दिले. याशिवाय कामाच्या संथ गतीवरून कंत्राटदार कंपनीला कारणे दाखवा नोटीस देण्याचे निर्देशही मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रकल्प विभागाला दिले.
वर्धा मार्गावरील कृपलानी चौक ते अजनी चौक दरम्यान विकसीत करण्यात आलेल्या प्रकल्पाच्या धर्तीवर अभ्यंकर नगर चौक ते काछीपुरा चौक पर्यंत ‘वॉकेबल स्ट्रीट’ साकारण्यात येणार आहे.