railway

– चोरीची रक्कम प्रेयसीच्या बँक खात्यात
– बँक खात्यातील रक्कम गोठविली
– कारागृहात ओळख अन् चोरीची योजना
नागपूर, 21 एप्रिल – एसीचे तिकीट काढून तो रेल्वेत चोरी करायचा. चोरीचे पैसे प्रेयसीच्या बँक खात्यात जमा करायचा. त्यापैशावर ती  मजा करायची. अशाच एका चोरीच्या प्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी रेल्वेतील शातीर चोर आणि त्याच्या प्रेयसीलाही अटक करून सखोल चौकशी केली. बँक खाते गोठविले. न्यायालयाच्या आदेशानंतर ती रक्कम मिळणार आहे.
उमाशंकर उर्फ टोनी (23), रा. राजस्थान असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मनोहर (रा. उज्जैन) नावाचा एक त्याचा साथीदार आहे. उमाशंकर 2015 मध्ये एका चोरी प्रकरणात भोपाळच्या कारागृहात असताना त्याची मनोहरशी ओळख झाली. कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्यांनी रेल्वेत चोरीची योजना आखली. उमाशंकर रितसर आरक्षण करून एसी डब्यातून प्रवास करायचा. प्रवासी साखर झोपेत असताना चोरी करून पुढच्या स्थानकावर उतरायचा. यासाठी त्याचा मित्र मनोहर मदत करायचा.  योजना यशस्वी झाल्यानंतर तो मनोहरला माहिती देत असे. मनोहर नियोजित स्थळी आल्यानंतर दोघेही चोरीची रक्कम वाटून घेत असत. उमाशंकर त्याच्या प्रेयसीच्या खात्यात रक्कम जमा करीत होता.
उमाशंकरने डिसेंबर 2021 मध्ये दिल्ली-चेन्नई दुरांतो मध्ये  चोरी केली. नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी थांबल्यानंतर त्याने प्रवाशांच्या रकमेवर हात साफ केला. प्रवाशाचे 45 हजार रोख आणि महागडे घड्याळ चोरले. चोरीचे पैसे त्याने प्रेयसीच्या बँक खात्यात जमा केले. त्याच्या प्रेयसीचे खाते कोटा येथील राष्ट्रीयकृत बँकेत आहे. तो वेगवेगळ्या नावाने रेल्वे तिकीटाचे आरक्षण करून चोरी करायचा आणि मिळालेली रक्कम प्रेयसीच्या बँक खात्यात जमा करीत असे. उपरोक्त प्रकरणाची नागपूर लोहमार्ग पोलिस ठाण्यात नोंद झाल्यानंतर पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीची ओळख पटविली. पोलिसांचे पथक राजस्थान,  मध्यप्रदेश, छत्तीसगढला रवाना झाले. स्थानिक पोलिसांना भेटून उमाशंकरचे छायाचित्र दिले.
दरम्यान राजस्थान पोलिसांनी उमाशंकरला एका चोरीच्या प्रकरणात अटक करून त्याची नागदा कारागृहात रवानगी केल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. त्यानुसार एक पथक कोटा येथे रवाना झाले. पोलिसांनी प्रोडक्शन वारंटवर उमाशंकरला ताब्यात घेवून नागपूरला आनले. तसेच त्याच्या प्रेयसीलाही अटक केली. दोघांचीही पोलिस कोठडी मिळविली. सखोल चौकशीअंती त्याने चोरीची कबूली दिली. तसेच चोरीचे पैसे प्रेयसीच्या बँक खात्यात जमा केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी कायदेशिर कारवाई करून प्रेयसीचे बँक खाते गोठविले. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक मनीषा काशिद, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विकास कानपिल्लेवार यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार दीपक डोर्लिकर, महेंद्र मानकर, विनोद खोब्रागडे, शैलेश उके आणि पप्पु मिश्रा यांनी केली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com