भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था,नागपूर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा “युवा संगम” उपक्रम २१ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी पर्यंत राबवणार

– २१ फेब्रुवारी रोजी आयआयआयटीएन, नागपूर कॅम्पस मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार उपक्रमाचा आरंभ

नागपूर :- पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या “एक भारत श्रेष्ठ भारत” कार्यक्रमा अंतर्गत केंद्रीय शिक्षण मंत्रालया तर्फे युवा संगम हा उपक्रम २१ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी पर्यंत राबविला जाणार असून ईशान्येकडील राज्य आणि इतर राज्यातील तरुणांमध्ये सहानुभूती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘युवा संगम ‘ पोर्टल सुरू झाले आहे. या उपक्रमासाठी नागपूरच्या वर्धा रोडस्थित वारंगा येथील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था – आयआयआयटीची प्रायोगिक संस्था म्हणून निवड झालेली असल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ.ओ.जी. काकडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

‘युवा संगम हा व्यापक सांस्कृतिक आदान प्रदान कार्यक्रम देशातील तरुणांना भारताची प्राचीन संस्कृती आणि नैसर्गिक विविधता अनुभवण्याची संधी देईल.एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत युवा संगम कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांना देशातील विविध राज्यांना भेटी देण्याची तसेच त्यांच्या कला संस्कृती आणि भाषा समजून घेण्याची संधी उपलब्ध करून देणार आहे. ईशान्येकडील राज्य आणि इतर राज्यामधील तरुणांना पर्यटन,परंपरा,प्रगती,औद्योगिकी आणि परस्पर संपर्क या पाच व्यापक क्षेत्रांतर्गत विविध पैलूंचा बहुआयामी अनुभव प्रदान करून देण्याचा युवा संगम उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

“एक भारत श्रेष्ठ भारत” हा उपक्रम केंद्रीय संस्कृती पर्यटन, रेल्वे, माहिती आणि प्रसारण, अशा विविध मंत्रालय आणि विभाग यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत २० हजाराहून अधिक तरुण देशभर प्रवास करतील आणि भारतातील विविध राज्यांच्या सांस्कृतिक वारसा यांचे दर्शन करतील युवा संगम कार्यक्रम ईशान्येतील तरुणांना संपूर्ण देशाशी जोडेल.केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने महाराष्ट्र राज्यातून आयआयटी नागपूरची प्रायोगिक संस्था म्हणून निवड केली आहे.

युवा संगमचा हा पहिला दौरा आहे जिथे मणिपूर राज्यातील विद्यार्थी महाराष्ट्र राज्याला भेट देणार आहे.या युवा संगम कार्यक्रमासाठी ३० विद्यार्थ्यांचा गट मणिपूर वरून महाराष्ट्रात येणार आहे. तसेच महाराष्ट्र मधून ५० विद्यार्थ्याचा गट हा मणिपूर ला जाणार आहे. २१ फेब्रुवारी रोजी आयआयआयटीएन, नागपूर कॅम्पस मध्ये या उपक्रमाचा उद्घाटन कार्यक्रम केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल त्यानंतर नितीन गडकरी यांच्यासोबत पाहुण्यांची चर्चा नियोजित केलेली आहे. यानंतर दीक्षाभूमी,झीरो माईल, राजभवन, कोराडी मंदिर, फुटाळा म्युझिकल फाऊंटन या ठिकाणी भेट आयोजित आहे.

पुढील दिवसात हा गट बाबा आमटे यांनी 1949 मध्ये स्थापलेल्या आनंदवन स्मार्ट व्हिलेज ला भेट देणार आहे. त्यानंतर सेवाग्राम येतील महात्मा गांधींचा आश्रम,पवनार येथील भूदान चळवळीचे संस्थापक आचार्य विनोबा भावे यांचे आश्रम,परमधाम आश्रम, पवनार ,गांधीस्तंभ आणि भारत राम मंदिर या ठिकाणी भेट आयोजित करण्यात आलेली आहे. तसेच पेंच राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पालाही विद्यार्थी भेट देणार आहे.

या पत्रकार परिषदेला कुलसचिव कैलास दाखले, असोसिएट डीन डॉ. मयूर पराते, एसएसी समन्वयक डॉ. हर्ष गौड, नोडल अधिकारी -एक भारत श्रेष्ठ भारत”ईबीएसबी डॉ. कीर्ती दोरशेटवार उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com