मुंबई फेस्टिव्हल 2024 मध्ये ‘महा मुंबई एक्स्पो’चे उद्घाटन

– महाराष्ट्राच्या भूमीत पर्यटनाच्या अमर्याद संधी – पर्यटन मंत्री गिरीश महाजन

मुंबई :- ‘महा मुंबई एक्स्पो’ मध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रतिभेचे आणि मुंबई शहराचे बहुआयामी सौंदर्य मांडण्यात आले आहे. मुंबई फेस्टिव्हल अंतर्गत सुरु असलेल्या ‘महा मुंबई एक्स्पो’ ला सर्वांनी जरुर भेट द्यावी, असे आवाहन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि वैविध्य दर्शविणाऱ्या मुंबई फेस्टिव्हल 2024 मधील ‘महा मुंबई एक्स्पो’ चे उद्धाटन वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते करून मुंबई फेस्टिव्हल 2024 ची सुरुवात झाली. शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, जपानच्या ओकायामा विधानसभेचे अध्यक्ष मरियामा, राज्याच्या पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, पर्यटन सदिच्छा दूत नवेली देशमुख यावेळी उपस्थित होते.

याठिकाणी 20 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या ‘महा मुंबई एक्स्पो’ मध्ये, सोमवार ते शुक्रवार या दिवशी दुपारी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत आणि शनिवार-रविवारी दुपारी 1 ते रात्री 10 वाजेपर्यंत असेल.या एक्सपोमध्ये महाराष्ट्राची कला, वारसा आणि चिरंतन परंपरा यांचे दर्शन, पारंपरिक खेळांच्या आनंदाशी पुन्हा कनेक्ट व्हायची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.

मंत्री महाजन म्हणाले की, या ‘महा मुंबई एक्स्पो’च्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती आणि वैविध्य जगासमोर येणार आहे. मुंबईकरांना आणि या महोत्सवात येणाऱ्या प्रत्येकासाठी हा विलक्षण अनुभव असणार आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक, सांगितिक श्रीमंती येथे येणाऱ्या प्रत्येकाला अनुभवायला मिळेल. राज्यात पर्यटनाच्या अमर्याद संधी असून देश-विदेशातील नागरिकांनी आवर्जून राज्यातील या स्थळांना भेट द्यावी. यामुळे राज्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

शालेय शिक्षण मंत्री केसरकर म्हणाले की, मुंबई फेस्टिव्हल पुन्हा सुरु झाला असून या फेस्टिव्हलच्या माध्यमातून मुंबई शहराची विविधता मांडण्यासाठी एक चांगल्या प्रकारचे व्यासपीठ आता उपलब्ध झाले आहे. हा फेस्टिव्हल सर्वांचा असून प्रत्येकाचा सहभाग यात महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यटन सचिव भोज म्हणाल्या की, आपल्या परंपरा आणि नावीन्यपूर्ण उपक्रम यांचा समन्वय साधत ‘महा एक्स्पो’ ची उभारणी करण्यात आली आहे. ‘महा मुंबई एक्स्पो’ ला प्रत्येक मुंबईकरांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

महामुंबई एक्स्पो 2024 मध्ये मुंबईतील विविध आणि सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये येथे येणाऱ्या नागरिकांना अनुभवायला मिळतील. भेलपुरी, पाणीपुरी, गोला, कुल्फी यासह मुंबई चौपाटी सारख्या स्टॉलवर मुंबईच्या प्रसिद्ध स्ट्रीट फूडचा विविध पदार्थांची लज्जत आणि आस्वाद घ्यायला मिळेल. मुंबई फेस्टिव्हल 2024 मध्ये “टेस्ट ऑफ मुंबई” या नावाने खाद्य पदार्थांचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. मुंबईतील विविध हॉटेलच्या स्टॉल्समधून स्वादीष्ट पदार्थ आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

गेम झोनमध्ये व्हर्च्युअल रिअॅलिटी गेम्स, बंपर कार, एअरलिफ्ट्स, कोलंबिया बोट्स आणि लाइफ साइज चौपर आणि स्नेक्स अँड लॅडर सारख्या पारंपरिक खेळांसह इमर्सिव्ह थ्रीलचा समावेश आहे. रिटेल झोनमध्ये रिटेल थेरपी असणार आहे. विविध 26 प्रकारचे खाद्यपदार्थ, विविध कलाकुसरीच्या वस्तू, लहान मुलांसाठी खेळणी आदींच्या वस्तूंचे स्टॉल्सही याठिकाणी असणार आहेत.

NewsToday24x7

Next Post

कॉमहेड इंटरनॅशनलने बिचोलिम गोवा येथील युनिक स्पेशल स्कूलला भेट

Sat Jan 20 , 2024
नागपूर :- COMHAD lninternational च्या सदस्यांना विशेष दिव्यांग मुलांसाठी आमच्या शाळेला भेट दिल्याने विशेषाधिकार आणि सन्मान वाटतो.डॉ. उदय बोधनकर कार्यकारी संचालक, डॉ.एम एस रावत सल्लागार, यशवंत पाटील माजी आंतर राष्ट्रीय अध्यक्ष आणि डॉ. केशव ठाकरे सेवा साधनेच्या नारायण झांटेय स्कूल फॉर स्पेशल चिल्ड्रन, बेचोलीम, गोवा येथे डॉ.गीतांजली लेले संघ संघटन सचिव यांनी भेट दिली.शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेतील विशेष मुलांनी तयार केलेले […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com