मुंबई रामकृष्ण मिशनचे आरोग्यसेवा, आदिवासी विकास कार्य कौतुकास्पद: राज्यपाल रमेश बैस
विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांना रामकृष्ण मिशन सोबत काम करण्याची सूचना
भुकेल्याला अन्न देतो, तो खरा धर्म असे स्वामी विवेकानंद यांनी सांगितले होते. विवेकानंदांचे हे स्वप्न साकार करायचे असल्यास काम करण्याच्या वयोगटातील प्रत्येक व्यक्तीला कौशल्य शिक्षण मिळाले पाहिजे. शासन व विद्यापीठे युवकांना कौशल्य शिक्षण देत असताना रामकृष्ण मिशन सारख्या संस्थांनी नीतिमूल्यांच्या माध्यमातून युवकांचे चारित्र्य घडविण्याचे कार्य करावे. या दृष्टीने राज्यातील विद्यापीठे व उच्च शिक्षण संस्थांनी रामकृष्ण मिशन सोबत काम करावे अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केली.
मुंबई :- रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन मुंबई शाखेच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षाचे उदघाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. २१) रंगशारदा सभागृह वांद्रे येथे पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी रामकृष्ण मिशन, बेलूर मठ येथील उपाध्यक्ष स्वामी गौतमानंद, महासचिव स्वामी सुवीरानंद, मुंबई मठाचे अध्यक्ष स्वामी सत्यदेवानंद, नरेन्द्रपूर केंद्राचे प्रमुख स्वामी सर्वलोकानंद, व्यवस्थापन समितीचे सदस्य राकेश पुरी तसेच देशविदेशातील रामकृष्ण मिशन शाखांचे प्रमुख उपस्थित होते.
देशातील युवा पिढी मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या अतिवापरात गुरफटत आहे, याबद्दल चिंता व्यक्त करताना व्यापक विचारांची युवा पिढी घडविण्यासाठी शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना साहस उपक्रम, क्रीडा प्रकार, शैक्षणिक सहली, ऐतिहासिक वारसा स्थळांना भेटी, दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद तसेच इतर धर्मियांच्या प्रार्थना स्थळांना भेटी देण्यास प्रवृत्त केले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.
रामकृष्ण मिशन मुंबईने खार येथील अद्ययावत हॉस्पिटलच्या तसेच पालघर जिल्यातील साकवार येथे आदिवासी बांधवांसाठी ग्राम विकास व कल्याण केंद्राच्या माध्यमातून मोठे कार्य उभे केले आहे असे सांगून राज्यपालांनी मुंबई रामकृष्ण मिशनला कौतुकाची थाप दिली.
स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पटलावर आले त्यावेळी भारत गरिबी, अंधश्रद्धा, उपासमार व अंधश्रद्धा या दुष्टचक्रात सापडला होता. शिकागो येथील आपल्या ओजस्वी भाषणातून स्वामीजींनी देश विदेशातील लोकांचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असे राज्यपालांनी सांगितले.
विवेकानंद स्मारक शिला निर्मितीत खारीचा वाटा
रायपूर येथे ज्या ठिकाणी आपला जन्म झाला, त्याच भूमीत रामकृष्ण मठाचे स्वामी आत्मानंद यांनी जन्म घेतला. रायपूर येथील रामकृष्ण आश्रमात आपण जात असू आणि ‘विवेक ज्योती’ मासिकाचे अनेक अंक आपण जमा केले होते अशी आठवण राज्यपालांनी यावेळी सांगितली.
कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक शिलेच्या निर्मितीसाठी आपण आठवडी बाजारात उभे राहून लोकांकडून एक-एक रुपयाची देणगी गोळा केली होती तसेच स्मारकाचे निर्माते एकनाथ रानडे यांच्या वाहनाचे सारथ्य केले होते अशी आठवण राज्यपाल बैस यांनी यावेळी सांगितली.
रामकृष्ण मिशन, बेलूर मठ येथून आलेले वरिष्ठ उपाध्यक्ष स्वामी गौतमानंद यांनी मनुष्य सेवा हीच सच्ची ईशसेवा असल्याच्या विवेकानंद यांच्या शिकवणीचे स्मरण दिले. मनुष्याने मुक्ती मिळविण्यासोबतच जगाचे हित करणे हा रामकृष्ण मिशनचा मूलमंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई रामकृष्ण मिशन शताब्दी साजरी करीत असताना रामकृष्ण मिशन संस्था आपल्या स्थापनेचे १२५ वे वर्ष साजरे करीत आहे. मिशनची १२५ वर्षांचे सेवाभावी कार्य हा देशातील मैलाचा दगड असल्याचे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले असल्याचे बेलूर मठ येथील रामकृष्ण मिशनचे महासचिव सुविरानंद यांनी सांगितले.
मुंबई रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष सत्यदेवानंद यांनी प्रास्ताविक केले तर व्यवस्थापन समितीचे सदस्य राकेश पुरी यांनी आभार प्रदर्शन केले.