भदंत ससाई यांचे आवाहन
नागपूर – फटाक्यांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढत असले तरी बच्चे कंपनीला आनंद मिळतो. क्षणिक आनंद घेण्यासाठी लहान मुले पालकांकडे आग्रह धरतात. मुलांच्या आनंदासाठी पालकही फटाक्यांची आतषबाजी करतात. मात्र, आनंद बाजुला सारून फटाक्यांची आतषबाजी न करता बालकांनी एक प्रकारे पर्यावरणाला सहकार्य केले. अशा बालकांचे दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी कौतुक केले. बालक दिनाचे औचित्य साधून इंदोरा बुद्ध विहारातील निवासस्थानी निवडक बालकांची मुक्तकंठाने स्तुती केली. यावेळी त्यांना संत्री वाटली.
शुक्रवार १२ नोव्हेंबरला सायंकाळी ६.३० वाजता भदंत ससाई यांनी फटाके न फोडणाèया बालकांना इंदोरा विहारातील निवास स्थानी बोलावून घेतले. सोबत पालकही आले. यावेळी बालकांचे लाड करून त्यांची विचारपूस केली. ‘फटाके फोडल्याने वातावरणातील हवा प्रदूषित होते. त्यामुळे फटाके फोडू नकाङ्क, असे आवाहन ससाई यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत काही बालकांनी फटाके न फोडता पर्यावरणाचे संरक्षण करण्यास सहकार्य केले. अशा बालकांचे कौतुक करून बालकांच्या माध्यमातून हा संदेश पुढे जाईल, अशी अपेक्षा ससाई यांनी व्यक्त केली. या उपक्रमामुळे मुलांना प्रोत्साहन तर मिळालेच शिवाय त्यांच्या माध्यमातून इतर बालकांना प्रेरणा मिळेल.
यावेळी ससाई म्हणाले, मानवी हस्तक्षेपामुळे प्रदूषणाच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. पर्यावरणाचे अपरिमित नुकसान होत आहे. वातावरणातील हवेमध्ये दूषित अपायकारक घटक मिसळल्यामुळे हवा प्रदूषित होत आहे. वायू प्रदूषण ही मोठी समस्या निर्माण होत आहे. यावर आत्ताच उपाययोजना न केल्यास प्राणवायूचे प्रमाण कमी होईल. ओझोन वायूच्या थरात घट होऊन पृथ्वीवरील सृष्टी धोक्यात येऊ शकते. या संकटाला ओळखून मानवाची पावले परिवर्तनाच्या दिशेला पुढे सरकली पाहिजेत. प्रदूषण होऊ न देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. वातावरणातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पालकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही ससाई यांनी केले.