जी-20 समुहातील सदस्य देशांची ओळख

जागतिक स्तरावरील जी-20 समुहाच्या सीव्हील-20 गटाची प्रारंभिक परिषद येत्या 20 ते 22 मार्च दरम्यान नागपूर येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर जी-20 सदस्य देशांची संक्षिप्त माहिती जाणून घेवूया.

अर्जेंटिना : दक्षिण अमेरिकेतील हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील आठव्या क्रमांकाचा मोठा देश आहे. सुमारे 4 कोटी 60 लक्ष लोकसंख्या असलेल्या या देशाची राजधानी ब्यूनस आयर्स आहे. स्पॅनिश ही या देशाची मुख्य भाषा होय.

ऑस्ट्रेलिया: दक्षिण गोलार्धातील बहुसांस्कृतिक देश. जवळपास 2 कोटी 12 लाख लोकसंख्या असणाऱ्या या देशाची राजधानी कॅनबेरा आहे. विस्तीर्ण क्षेत्रफळ लाभलेल्या या देशात 10 टक्के पेक्षाही कमी कृषियोग्य जमीन आहे.

ब्राझील: दक्षिण अमेरिकेतील हा देश क्षेत्रफळानुसार जगातील पाचवा मोठा देश. राजधानी ब्राझीलिया असून पोर्तुगीज ही अधिकृत भाषा. लोकसंख्या सुमारे 21 कोटी 50 लाख आहे. जगातील सर्वात मोठे जंगल आणि सर्वात लांब नदी ‘ॲमेझॉन’ येथेच आहे. प्रत्येक शहरात फुटबॉल स्टेडियम असलेला हा जगातील सर्वाधिक संत्रा उत्पादन करणारा देश.

कॅनडा : उत्तर अमेरिकेतील या देशाचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात दुसरा क्रमांक. हा विकसित देश आहे. लोकसंख्या सुमारे 3 कोटी 69 लाख आहे.ओटावा हे राजधानीचे शहर तर फ्रेंच व इंग्लिश येथील प्रमुख भाषा आहेत.

चीन: जवळपास 142 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेला पूर्व आशियात स्थित हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश. बीजिंग हे राजधानीचे शहर. जगात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत चीन अग्रक्रमावर आहे.

फ्रान्स: पश्चिम युरोपातील समृद्ध इतिहास आणि वैविध्यपूर्ण संस्कृती लाभलेला देश. पॅरिस हे राजधानीचे शहर. जवळपास 6 कोटी 76 लाख लोकसंख्या. या देशातील आयफेल टॉवर प्रसिद्ध असून सिनेरसिकांना फ्रान्सच्या कान्स फिल्म फेस्टीव्हल आकर्षण असते.

जर्मनी: हा युरोपियन देश असून बर्लिन ही राजधानी. जवळपास 8 कोटी 30 लाख लोकसंख्या असलेल्या जर्मनीची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकाची आहे. हा देश ऑटोमोबाईल्स, यंत्रसामग्री आणि रसायनांचा प्रमुख उत्पादक आहे.

भारत: 141 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या येथे एकोप्याने नांदते. दिल्ली हे राजधानीचे शहर. जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असणाऱ्या भारत देशाची वाटचाल तिसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकाविण्याकडे आहे.आयुर्वेद ही पारंपारिक औषध प्रणाली, भारतात 5 हजार वर्षांपूर्वी विकसित झाली. भारताकडे यंदाच्या जी-20 शिखर परिषदेचे यजमानपद आहे.

इंडोनेशिया: हा दक्षिणपूर्व आशियामधील अनेक बेटांचा बनलेला एक द्वीपसमूह आहे. जकार्ता ही या देशाची राजधानी.जवळपास 27 कोटी 2 लाख लोकसंख्या असलेला हा देश लोकसंख्येच्यादृष्टीने जगात चौथ्या क्रमांकावर आहे. हा देश विपुल नैसर्गिक साधन संपत्तीसाठी ओळखला जातो.

इटली: हा युरोपियन देश वास्तुकला, पाककृती आणि फॅशन उद्योगासाठी ओळखला जातो. लोकसंख्या सुमारे 6 कोटी असून रोम हे राजधानीचे शहर आहे. येथील पिसाचा झुकता मनोरा जगप्रसिद्ध आहे.

जपान: पूर्व आशियात स्थित चार मुख्य बेटे आणि अनेक लहान बेटांचे मिळून बनलेले एक राष्ट्र. टोकियो ही राजधानी असून या देशाची लोकसंख्या सुमारे 12 कोटी 50 लाख आहे. तांत्रिक प्रगतीसोबतच समृद्ध संस्कृतीक वारश्यासाठी हा देश ओळखला जातो.

मेक्सिको:  उत्तर अमेरिकतील या देशाची गणना जगातील पहिल्या 15 श्रीमंत देशात होते. मेक्सिको सिटी हे राजधानीचे शहर असून लोकसंख्या जवळपास 13 कोटी 25 लाख आहे. कारखानदारी, कृषिउद्योग आणि पर्यटन क्षेत्रात हा देश अग्रेसर आहे.

रशिया: क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात मोठा देश.जवळपास 14 कोटी 62 लाख लोकसंख्या. मॉस्को हे रशियाच्या राजधानीचे शहर आहे. हा जगातील तेल, नैसर्गिक वायू आणि धातुंचा प्रमुख उत्पादक देश होय.

सौदी अरेबिया: आशिया खंडाच्या नैऋत्य टोकावर स्थित हा जगातील सर्वात मोठा तेल निर्यातक देश आहे. या देशाची लोकसंख्या सुमारे 3 कोटी 64 लाख असून ‘रियाद’ ही राजधानी आहे.

दक्षिण आफ्रिका: सोने, प्लॅटिनम आणि हिरे यांचा प्रमुख उत्पादक म्हणून या देशाची ओळख.तीन राजधानींसाठी प्रसिद्ध असलेल्या या देशाची प्रशासकीय राजधानी ‘प्रिटोरिया’ आहे. लोकसंख्या सुमारे 6 कोटी आहे.

दक्षिण कोरिया: पूर्व आशियाई देश उच्च तंत्रज्ञान, उद्योग आणि समृद्ध संस्कृतीसाठी हा देश ओळखला जातो. जवळपास 5 कोटी 17 लाख लोकसंख्येचा हा देश इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स आणि यंत्रसामग्रीचा प्रमुख उत्पादक आहे.

तुर्की: आशिया व युरोप खंडांना जोडणारा दुवा म्हणून तुर्कस्तान ओळखला जातो. ‘अंकारा’ ही तुर्कस्तानची राजधानी. दार्दानेल्स आणि बॉस्पोरस या सामुद्रधुन्यांमुळे तुर्कस्तानला आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे.

युनायटेड किंगडम : यूरोपच्या वायव्य किनाऱ्याजवळील अटलांटिक महासागरातील इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड या प्रमुख चार प्रादेशिक विभागांचा बनलेला द्वीपरूप देश. याचे अधिकृत नाव ‘युनायटेड किंग्डम ऑफ ग्रेट ब्रिटन अॅण्ड नॉदर्न आयर्लंड’ आहे. ‘ग्रेट ब्रिटन’ अथवा ‘ब्रिटन’ या नावांनीही या देशाचा उल्लेख होतो. या देशाची अर्थव्यवस्था जगात सहावी मोठी अर्थव्यवस्था आहे.

युरोपियन युनियन : ही जगातील सर्वांत मोठी राजकीय व आर्थिक संघटना आहे. युरोपमधील 27 राष्ट्रे या संघटनेचे सदस्य आहेत. वैश्विक शांततेचा प्रसार व लोकशाही मुल्यांच्या जोपासनेच्या उल्लेखनीय कार्यासाठी यूरोपीयन संघाला 2012मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले.

 – गजानन जाधव, माहिती अधिकारी, माहिती व जनसंपर्क, नागपूर.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com