Ø पर्यटकांसाठी तयार होताहेत विविध सुविधा
Ø जिल्हाधिकाऱ्यांची दुसऱ्यांदा अंधारवाडी भेट
यवतमाळ :- टिपेश्वर अभयारण्याच्या वेशीवर आणि निर्गाच्या कुशीत असलेल्या अंधारवाडी या जिल्ह्यातील पहिल्या मधाच्या गावाचा चेरामोहरा बदलत आहे. पर्यटकांना उत्तम दर्जाच्या मधासह चांगला अनुभव देण्यासाठी गावकरी सरसावले आहे. जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी काल दुसऱ्यांदा गावाला भेट दिली. गावकऱ्यांच्या उत्साहाने जिल्हाधिकारी देखील भारावले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून अंधारवाडी हे आदिवासी गाव मधाचे गाव म्हणून नावारूपास येत आहे. येथे २५ कुटुंबात प्रत्यक्ष मध संकलनास सुरुवात झाली असून अजून ३५ कुटुंबाला प्रशिक्षण देऊन मध संकलन सुरु केले जाणार आहे.
टिपेश्वर अभयारण्य येणाऱ्या पर्यटकांना येथे उत्तम दर्जाचे मध उपलब्ध होतील शिवाय त्यांना गाव पर्यटन, होम स्टे, आदिवासी प्रथा, परंपरा, संस्कृतीचे दर्शन या गावात घडणार आहे. पर्यटकांना अंधारवाडीत आल्यानंतर प्रसन्न आणि आनंददायी वातावरण मिळावे यासाठी विविध विभागाच्यावतीने विविध विकासात्मक कामे केली जात आहे. त्याचा आढावा देखील जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अंधारवाडी येथेच आयोजित बैठकीत घेतला.
गावात काही कुटुंबांकडे होमस्टेची व्यवस्था केली जात असून त्यासाठी तयार करावयाच्या बांबूच्या निवासी कुटीवर चर्चा झाली. गावातील रस्ते, स्वच्छता, रंगरंगोटी, पर्यटकांना बसण्याची ओटे, गावातील युवकांना सफारी वाहने उपलब्ध करून देणे आदींचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. काही कुटुंबाला भेटी देऊन मध संकलनाची प्रगती त्यांनी जाणून घेतली.
पर्यटकांना स्वतःच काढता येतील मध
अंधारवाडी येथे सर्व सुविधा उपलब्ध झाल्यानंतर पर्यटकांची सफारी या गावाला देखील भेट देईल. पर्यटक त्यांच्या सोईच्या कुटुंबाला भेट देऊन स्वतः च्या हाताने मध काढून विकत घेऊ शकेल. यामुळे वेगळा अनुभव पर्यटकांना मिळेल. चहा, नास्ता, भोजन आणि निवासाची आनंद देखील पर्यटक घेऊ शकतील.
२६ जानेवारीपर्यंत सुविधांची निर्मिती
येत्या २६ जानेवारी पर्यंत मोठे बांधकाम वगळता सर्व सुविधा निर्माण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या. प्रत्येक सुविधेचा स्वतंत्र आढावा त्यांनी घेतला.