अंगणवाड्यांच्या बळकटीकरणावर शासनाचा भर – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा

५० अंगणवाड्या दत्तक देण्यासाठी विविध संस्थांशी सामंजस्य करार

मुंबई : लोकसहभागातून अंगणवाडी केंद्रे बळकट करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. अंगणवाडी केंद्र दत्तक देवून अंगणवाडी बळकटीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून या अंतर्गत महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनकल्याण समिती, युनायटेड वे मुंबई, सुरक्षा चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्ट, भव्यता फाउंडेशन आणि लायन्स क्लब ऑफ जुहू यांच्यामध्ये आज झालेल्या सामंजस्य करार (एमओयू) अंतर्गत 50 अंगणवाड्या दत्तक देण्यात आल्या आहेत. यामुळे या अंगणवाड्यांचे बळकटीकरण होण्यास मदत होणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.               मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या दालनात आज अंगणवाडी दत्तक धोरण अंतर्गत महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन आणि जनकल्याण समिती यांच्यामध्ये एक सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला, त्यावेळी मंत्री लोढा बोलत होते. एकात्मिक बालविकासच्या आयुक्त रुबल अग्रवाल, महिला व बालविकास विभागाचे उपसचिव वि.रा.ठाकूर, अवर सचिव खान, एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे उपायुक्त विजय क्षीरसागर, जनकल्याण समितीचे अजित मराठे, युनायटेड वे मुंबईचे अनिल परमार, सुरक्षा चॅरिटेबल ट्रस्टचे जय कुमार जैन, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्टचे जयराम शेट्टी, भव्यता फाऊंडेशनचे कुनिक मणियार, लायन्स क्लब ऑफ जुहूचे अंकित अजमेरा उपस्थित होते.

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, या करारानुसार पुढील १० वर्षांसाठी शासनाला सहाय्य करण्यासाठी अंगणवाडी दत्तक घेतल्या आहेत. जनकल्याण समिती मुंबईतील १२ अंगणवाड्या, युनायटेड वें मुंबई कर्जत मधील वीस अंगणवाड्या, सुरक्षा चॅरिटेबल ट्रस्ट यांनी वडाळा मधील तीन, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे ईस्ट यांनी पश्चिम उपनगर येथील पाच, भव्यता फाउंडेशन यांनी मुंबई उपनगर घाटकोपर येथील पाच अंगणवाड्या, लायन्स क्लब ऑफ जुहू यांनी मुंबई उपनगरातील पाच अशा ग्रामीण व शहरी मिळून ५० अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत.

दत्तक घेतलेल्या कालावधीत या अंगणवाड्यांचे नूतनीकरण, रंगकाम, फर्निचर, क्षमता वाढ, आरोग्य तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर उपक्रमांची जबाबदारी देखील जनकल्याण समिती द्वारे घेण्यात येणार आहे. अंगणवाडी दत्तक घेण्यासाठी 9082269044 या नंबर वर संपर्क साधावा, असेही मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.

तसेच राज्यातील प्रत्येक माता निरोगी राहून, लहान बालक सुदृढ ठेवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. सक्षम राज्य निर्मिती होण्याकरिता अंगणवाडी केंद्र दत्तक घेणे ही शासनाची नावीन्यपूर्ण संकल्पना आहे. या संकल्पनेला सर्वांनी पुढे नेण्यासाठी ‘चला अंगणवाडी दत्तक धोरणाला हातभार लावूया व महाराष्ट्र राज्याला एक सक्षम व सुदृढ पिढी देवूया’, असेही ते म्हणाले.

एकात्मिक बालविकासच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, राज्यात एक लाख दहा हजार अंगणवाडी असून दरवर्षी पाच हजार अंगणवाड्यांना स्मार्ट सुविधा देण्यात येतात. याव्यतिरिक्त उर्वरित अंगणवाड्यांना अंगणवाडी दत्तक धोरण अंतर्गत विकास करण्यासाठी हे धोरण राबवण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगामुळे नागरिकांच्या तक्रारींची सोडवणूक - डॉ. ज्ञानेश्वर मुळे

Wed Jan 11 , 2023
मुंबई : मानवी हक्कांची जपणूक करण्यासाठी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग कार्यरत आहे. समाजामध्ये याबद्दल जाणीव जागृती व्हावी, या हेतूनेच ‘राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आपल्या घराच्या उंबरठ्यापर्यंत’ ही संकल्पना समोर ठेवून सुनावणी आयोजित करण्यात आल्या आहेत. नागरिकांना या माध्यमातून त्यांच्या तक्रारींची सोडवणूक करण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे, असे प्रतिपादन आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्यावतीने आज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com