लाभार्थ्यांना तीन ते चार महिने प्रशिक्षण : २७ मार्चपर्यंत करा नोंदणी
नागपूर :- दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत कौशल्य प्रशिक्षणाद्वारे रोजगाराची उपलब्धता या घटका अंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे लाभार्थ्यांना तीन ते चार महिन्यांचे नि:शुल्क व्यावसायिक कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ‘SMART’ (Skill India Portal) या संकेतस्थळावर ‘ट्रेनिंग पार्टनर’ व ‘ट्रेनिंग सेंटर’ म्हणून नोंदणी असलेल्या संस्थांच्या माध्यमातून हे नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इच्छूक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह २७ मार्च २०२३ पर्यंत आपल्या संबंधीत मनपाच्या झोन कार्यालयातील समाज विकास विभागाच्या समुदाय संघटकांकडे नोंद करावी, असे आवाहन समाज विकास विभागाचे उपायुक्त श्री. प्रकाश वराडे व समाज विकास अधिकारी डॉ. रंजना लाडे यांनी केले आहे.
प्रशिक्षण लाभार्थ्यांसाठी पात्रतेचे निकष निर्धारित करण्यात आलेले आहेत. लाभार्थ्याची वयोमर्यादा १८ ते ४५ या वयोगटात असावी. लाभार्थी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्यांक, बीपीएल, एसईसीसी या प्रवर्गातील असावेत. महिलांसाठी यासंदर्भातील कुठलीही अट नाही. लाभार्थी हा नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असावा. झोन कार्यालयात नोंदणी करताना आधार कार्ड, बँक पासबुक, रेशन कार्ड, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (टी.सी.), विद्युत बिल, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत जोडावे. प्रशिक्षणाचा कालावधी हा ३०० ते ४०० तास अर्थात ३ ते ४ महिन्यांचा राहिल. प्रक्षिणार्थ्यांची हजेरी बायोमॅट्रिक डिव्हाईसच्या माध्यमातून घेण्यात येईल. प्रशिक्षण वर्गामध्ये प्रशिक्षणार्थींची ८० ते १०० टक्के हजेरी असणे आवश्यक असेल. तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्यावर मुल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक राहिल. प्रशिक्षण घेण्याकरिता कोणतेही छात्रवृत्ती (विद्यावेतन) देण्यात येणार नाही. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना शासनमान्य Sector Skill Council चे प्रमाणपत्र, कौशल्य प्रशिक्षण संस्थेमार्फत रोजगार व स्वयंरोजगाराची उपलब्धता दिली जाईल. अशी माहिती समाज विकास विभागाचे उपायुक्त प्रकाश वराडे व समाज विकास अधिकारी डॉ. रंजना लाडे यांनी दिली.
प्रशिक्षणार्थींना खालील यादीतील नमूद प्रशिक्षण संस्थां आणि तेथील कोर्सेसची निवड करून ती माहिती नोंदणी करते वेळी संबंधित झोन कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.