सी-20 परिषदेसाठी नागरी संस्थांकडून मागविण्यात येत आहेत प्रस्ताव 15 मार्चपर्यंत इंग्रजी भाषेत पाठवा – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आवाहन

नागपूर : नागपूर शहरात २० ते २२ मार्च २०२३ दरम्यान जी-२० परिषदेंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या सी-२० परिषदेसाठी नागपूर आणि विदर्भातील नागरी संस्थांकडून प्रस्ताव व सूचना मागविण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात हे प्रस्ताव मागविण्यासाठी विशेष कक्षही स्थापन करण्यात आला आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर हे प्रस्ताव जावे यासाठी सादरकर्त्याने इंग्रजी भाषेमध्ये तातडीने पुढील १५ मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्यात यावे, असे आवाहन डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

नागपुरातील सी-२० परिषदेच्या आयोजनात जी-20 देशांचे सदस्य असणारे सी-20 देशांचे जवळपास 60 प्रतिनिधी आणि भारतातील विविध नागरी संस्था व आमंत्रित देशाचे असे जवळपास 250 प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. शाश्वत विकासात नागरी संस्थांचे योगदान सी-२० परिषदेची मध्यवर्ती कल्पना आहे. या संकल्पनेवर आधारित 14 विषयांवर परिषदेत चर्चा व मंथन होणार आहे. यामध्ये नद्यांचे पुनरुज्जीवन व पाणी व्यवस्थापन, लोकशाहीच्या अंमलबजावणीसाठी पूर्वलक्ष आणि संधी, मानवी मुल्यांसाठी मानवी अधिकार, ‘एकात्मिक समग्रह आरोग्य: मन, शरीर, वातावरण’, ‘पारंपारिक कलेचे जतन आणि संवर्धन, हस्तकला आणि संस्कृती: पारंपारिक आणि सृजनात्मक मार्गाने रोजगार’, लैंगिक समानता आणि अपंगत्व, ‘शाश्वत आणि परिवर्तनशील समुदाय: वातावरण, पर्यावरण आणि नेट झिरो टार्गेट’, आणि नागरी आवाजास वाव, ‘तंत्रज्ञान, संरक्षण आणि पारदर्शिता, वसुधैव कुटुंबकम-जग एक परिवार, पर्यावरणासाठी जीवनशैली, ‘विविधता, समावेशिता, परस्पर आदर’, सेवा-सेवा,परोपकार आणि स्वयंसेवकपणाची भावना, या विषयांचा समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत नागरी संस्थांसाठी ही नामी संधी आहे. या संधीचा उपयोग करून नागपूर व विदर्भातील नागरी संस्थानी जागतिक स्तरावर उपयुक्त ठरतील अशा सूचना व मते प्रस्ताव स्वरुपात देण्याची मागणी करण्यात आली आहे. या संस्थाना आपल्या सूचना व मते नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या [email protected] या ई-मेल आयडीवर इंग्रजी भाषेमध्ये मोठ्या फॉन्डमध्ये पीडीएफ आणि स्वॉफ्ट कॉपी स्वरुपात पाठविता येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात या करिता स्थापन केलेल्या विशेष कक्षात कार्यालयीन वेळेमध्ये तयार केलेला हा प्रस्ताव सादर करता येईल. कृपया याची नोंद घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com