संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी फॉर्मर युनिक आयडी नोंदणीचे काम सुरू करण्यात आले असून यासाठी गावागावात फॉर्मर युनिक आय डी नोंदणीचे कामाला सुरुवात करण्यात आली.कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शेतकऱ्यांना जलद गतीने सेवा देण्यासाठी युनिक आय डी चा उपयोग होणार असून यात शेतकऱ्याच्या नावावर शेतजमीन असेल तरच त्यांना फॉर्मर आय डी मिळणार आहे याद्वारे शेतकऱ्यांना सेवा सुविधा त्यातून मिळू शकतील याद्वारे शेतकऱ्यासाठी ऍग्रिस्टेक नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहे. ही योजना शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी व शेतकऱ्यांची ओळख पटवून देण्यासाठी पारदर्शक व सोपी पद्धत विकसित करण्यात आली आहे तरी शेतकऱ्यांनी ऍग्रिस्टेक योजनेअंतर्गत 4 ते 7 फेब्रुवारी पर्यंत कामठी तालुक्यातील कामठी, कोराडी, महालगाव ,तरोडी बु,वडोदा या पाच मंडळ निहाय गावागावात राबविण्यात येणाऱ्या ऍग्रिस्टेक योजना शिबीरातून तात्काळ स्वतःची फॉर्मर आय डी नोंदणी करून घ्यावी अशी माहिती तहसीलदार गणेश जगदाळे यांनी प्रसिद्धीपत्रकातुन दिली.
कृषी,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय ,विकास व मत्स्यव्यवसाय विभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार ऍग्रिस्टेक योजनेस मान्यता देण्यात आली असून या योजनेत सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतीचा आधार संलग्न माहिती संच(शेतकरी नोंदणी)तयार करण्यात येत आहे.या नोंदणीतून शेतकऱ्यांना विविध योजनेचा लाभ ,पीक विमा,आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाई तसेच शेतकऱ्यांनी कृषी कर्ज व इतर सेवा देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.