सिंगल युज प्लास्टिकला पर्यायी वस्तूंचे मंत्रालयात प्रदर्शन
मुंबई :- सिंगल युज प्लास्टिकला सशक्त पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून पर्यावरण संवर्धनात प्रत्येकाने मोलाची भूमिका बजावली पाहिजे, असे प्रतिपादन पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी केले.
22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुधंरा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून 20 व 21 एप्रिल 2023 रोजी पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सिंगल युज प्लास्टिकला पर्यायी वस्तूंचे प्रदर्शन मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री.दराडे यांच्या हस्ते झाले. यावेळी विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सिंगल युज प्लास्टिकच्या वापराला पूर्णपणे बंदी जाहीर झाल्यानंतर त्याला पर्यायी वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागले आहे. परंतू सिंगल युज प्लास्टिकला सक्षम पर्यायी वस्तू उपलब्ध होऊ शकतात याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यापक जागृती करण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंगल युज प्लास्टिक म्हणजे एकदा वापरून फेकून देण्यात येणाऱ्या वस्तू. उदा. प्लास्टिकचे चमचे, प्लास्टिक प्लेटस्, प्लास्टिकच्या वाट्या, हॉटेलमधून अन्नपदार्थ ग्राहकांना पोचवण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिकचे डबे, स्ट्रॉ, प्लास्टिक पिशव्या आदी. अशा वस्तूंना पर्यायी असणाऱ्या वस्तू या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वाळ्याचे गणपती, मातीचा पुनर्वापर करून तयार केलेली गणेशमूर्ती, ग्रीन गीफ्टींग वृक्ष वाटिका, पुठ्ठयांपासून बनवलेली लहान मुलांची खेळणी अशा विविध रेखीव वस्तू या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
या प्रदर्शनात नारळाच्या विविध घटकांपासून तयार करण्यात आलेले चमचे, वाट्या, प्लेटस्, कापडांपासून तयार करण्यात आलेल्या विविध पिशव्या, आभूषणे, नारळाच्या झावळ्यांपासून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू, पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅड, बांबूपासून तयार करण्यात आलेली आभूषणे, वर्तमानपत्राच्या रद्दीतून तयार करण्यात आलेल्या पेन्सिल, रिसायकल पेपरमधून तयार केलेले पँकिंग साहित्य व बेंचेस, टी पॉय अशा अनेक नाविन्यपूर्ण वस्तू या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.
पहिल्याच दिवशी या प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. या प्रदर्शनात मुंबई, पुणे, रत्नागिरी व तामिळनाडू येथील व्ही. एल. व्हेन्चर, जयना पॅकेजिंग, वृक्षवल्ली, मेनन, पर्यावरण दक्षता मंच, गो डू गुड पॅकेजिंग, बांबू तंत्रा, इको एक्झिट अशा संस्था सहभागी झाल्या आहेत.