नागपूर, ता. १७: केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तसेच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरात ‘हर घर दस्तक’ अभियांनातंर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत दहाही झोनमधील घर भेटीत आतापर्यंत पहिला आणि दुसरा असे एकूण १५ हजार ३१६ लसीकरणाचे डोस देण्यात आले आहेत. यात १८ वर्षावरील ९ हजार ६४० नागरिकांना पहिला डोस तर ५६७६ नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला.
हर घर दस्तक मोहिमेअंतर्गत मनपा आरोग्य विभागाच्या चमूने मंगळवारी (ता. १६) दहाही झोनमधील ३७ हजार ३२७ घरी भेटी तर आतापर्यंत ८५ हजार ५९३ घरी भेटी दिल्या. भेटीदरम्यान १८ वर्षावरील एकही डोस न घेतलेले ८९१९ नागरिक आढळून आले. यापैकी पात्र नागरिकांना लसीचा पहिला पहिला डोस देण्यात आला. आसीनगर झोन मध्ये सर्वाधिक ३३२६ नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला तर हनुमाननगर झोन मध्ये सर्वाधिक २८९९ नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.
या अभियानांतर्गत आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने आशा वर्कर प्रत्येक नागरिकांच्या घरी भेटी देत आहेत. भेटीतून कुटुंबातील लसीकरण झाले किंवा नाही याबद्दल माहिती घेत आहेत. याशिवाय लसीकरणाचा टक्का कमी असलेल्या भागात शिबिरेदेखील आयोजित करण्यात येत आहेत. तसेच मोहिमेला गती देण्यासाठी आशा वर्कर, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्थाद्वारे नागरिकांना लसीकरणाचे महत्व सांगून लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. त्यामुळे मोहिमेत शहरातील जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी होऊन लसीकरणासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे