– दक्षिण नागपुरातील विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
नागपूर :- नागपूर शहरामध्ये २४ तास शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे हे एक स्वप्न होते. यादृष्टीने मागील काही वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. या कार्यात पुढाकार घेत नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरात विविध भागात पाण्याच्या टाक्यांची निर्मिती करण्यात आली. दक्षिण नागपुरात नवीन सात टाक्यांचे लोकार्पण झाले आहे. या सर्व बाबी नागपूर शहरातील २४ तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न पूर्णत्वाकडे नेणा-या आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रातील स्मार्ट सार्वजनिक शौचालयांचे भूमिपूजन तसेच विविध ठिकाणच्या जलकुंभांचे लोकार्पण व नागपूर सुधार प्रन्यासच्या वतीने विविध विकास कामांचे भूमिपूजन गुरूवारी (ता.१४) केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले.
तपस्या शाळा मार्गावरील शेष नगर बस स्थानक परिसरात संपन्न झालेल्या कार्यक्रमात दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, माजी नगरसेक जितेंद्र (बंटी) कुकडे, माजी नगरसेविका माधुरी ठाकरे, मंगला खेकरे, माजी नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, नागेश मानकर, विजय (पिंटू) झलके, माजी नगरसेविका स्नेहल बिहारे, भारती बुंडे, उषा पॅलेट, लता काडगाये, मनपाचे उपायुक्त निर्भय जैन, रवींद्र भेलावे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, सहायक आयुक्त नरेंद्र बावनकर, कार्यकारी अभियंता सुनील उइके, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी विजय जोशी, स्वप्नील लोखंडे, नासुप्रचे भंडारकर, अंभोरकर, विजय आसोले, रितेश पांडे, संजय ठाकरे, देवेंद्र दस्तुरे, गजानन शेळके, मनोज जाचक, ज्योती देवघरे, कुलदीप माटे आदी उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या कोनशिलेचे डिजिटल अनावरण करण्यात आले.
नागपूर शहरात चौफेर होत असलेल्या विकासाचे श्रेय येथील जनतेलाच असल्याचे गौरवोद्गार यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. पिण्याचे पाणी, गडर लाईन या समस्या सोडविण्यासाठी शहरात आज सुरू असलेल्या कामांबद्दल त्यांनी नागपूर महानगरपालिका आणि नागपूर सुधार प्रन्यासचे अभिनंदन केले. नागरिकांना २४ तास योग्य प्रवाहात पाणी मिळावे यासाठी पेंच ते गोरेवाडा येथे विशेष पाईप लाईन टाकण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. दक्षिण नागपूर भागामध्ये असलेल्या अनियमित लेआउटमध्ये असलेली पाणी आणि ड्रेनेजची समस्या सोडविण्यासाठी उत्तम दर्जाची पाईप लाईन टाकण्याची सूचना ना.गडकरी यांनी केली. नागरिकांच्या सुविधेकरिता मनपाद्वारे सुरू करण्यात आलेले स्मार्ट सावर्जनिक शौचालय ही उत्तम सुरूवात असल्याचे त्यांनी नमूद केले. चांगली उद्याने, खेळांची मैदाने, प्रधानमंत्री आवास योजनेतून गरीबांना पक्की घरे मिळवून देत नागरिकांच्या चेह-यावर आनंद निर्माण करून त्यांना सुलभतेचे जीवन मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
आमदार मोहन मते यांनी दक्षिण नागपूरमधील कामाचा आढावा घेतला. एकेकाळी कुठलीही सुविधा नसलेल्या दक्षिण नागपूर परिसरात आज अनेकाविध सुविधा सज्ज आहेत. येथील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने जलकुंभांच्या निर्मितीसाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांनी अभिनंदन केले. मानेवाडा ते बेसा येथे नवीन उड्डाण पूल बनणार असून यामुळे वाहतुकीच्या समस्येवर मोठा दिलासा मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दक्षिण नागपूर भागामध्ये मुलांना खेळण्यासाठी चांगली मैदाने तयार व्हावीत, यासाठी प्रयत्नशील असल्याचेही आमदार मोहन मते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नागपूर शहरातील विकास कामांची माहिती दिली. ते म्हणाले, नागपूर शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यास नागपूर महानगरपालिका कटिबद्ध आहे. यातील उत्तम रस्ते, पिण्याचे शुद्ध पाणी आणि दर्जेदार आरोग्य सुविधा प्रदान करण्याच्या दृष्टीने महत्वाचे कार्य सुरू आहेत. नागपूर शहरातून टँकर पूर्णत: हद्दपार करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाउल आज टाकण्यात येत आहे. दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रात निर्माण झालेल्या सात नवीन जलकुंभांमुळे परिसरातील बहुतांशी भाग टँकरमुक्त होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी यांनी नासुप्रद्वारे क्षेत्रात सुरू असलेल्या व प्रस्तावित कामांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन रेणूका देशकर यांनी केले व शेवटी त्यांनी आभार देखील मानले.