देवनार पूर्व बेस्ट कामगार वसाहती नजीकची ड्रेनेज लाईन बदलावी – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई :- देवनार पूर्व बेस्ट कामगार वसाहत नजीकच्या ड्रेनेज लाईन बदलण्याचे काम तत्काळ सुरू करावे, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रशासनाला दिले.

एम.ईस्ट वॉर्ड, गोवंडी (पूर्व) येथे पार पडलेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार अबू आझमी, तसेच सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देवनार बेस्ट कामगार वसाहत मुंबई (पूर्व) येथे गेले ३० वर्षे ड्रेनेज लाईन तसेच इमारतींची देखभाल दुरूस्ती झालेली नाही. येथील नागरिकांची अडचण सोडविण्यासाठी प्रशासनाने प्राधान्याने कार्यवाही करावी. या कामामध्ये दिरंगाई करू नये. महाराष्ट्र नगर ते मानखुर्द घाटकोपर येथे पूलाचे बांधकाम गतीने पूर्ण करावे, असे निर्देश मंत्री लोढा यांनी दिले.

नागरिकांनी २७५ विविध विषयांवर आपले तक्रार अर्ज दिले. तर ७४ अर्जदारांनी पालकमंत्री यांच्या समोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी दिल्या.

‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रम दि. १५ ऑक्टोबर रोजी एच वेस्ट वॉर्ड- वांद्रे पश्च‍िम येथे सकाळी १० वाजता सुरू होईल. नागरिकांना प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन ही जिल्हाधिकारी : https://mumbaisuburban.gov.in बृहन्मुंबई महानगरपालिका : portal.mcgm.gov.in वरील लिंक वरही ऑनलाइन तक्रार करता येतील.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com