यवतमाळ :- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने जिल्हास्तरीय समृद्धी मिनी सरस प्रदर्शन व विक्री दि.1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान समता मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनीचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते होणार आहे.
उद्घाटन कार्यक्रमास पालकमंत्र्यांसह आदिवासी विकास मंत्री प्रा.डॅा.अशोक उईके, राज्यमंत्री इंद्रनिल नाईक, खा.संजय देशमुख, खा.प्रतिभा धानोरकर, खा.नागेश पाटील आष्टीकर, आ.भावना गवळी, आ.किरण सरनाईक, आ.धीरज लिंगाडे, आ.राजू तोडसाम, आ.बाळासाहेब मांगुळकर, आ.संजय देरकर, आ.किसन वानखेडे, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक कुमार चिंता आदी उपस्थित राहणार आहे.
पाच दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात स्वयंसहायता समूहांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे. प्रदर्शनात बांबूच्या कलाकृती, खेळणी, काष्ठशिल्पे, खवय्यांसाठी खास मटन मांडे, पुरणपोळी, लज्जतदार वऱ्हाडी जेवनाची मेजवाणी राहणार आहे. सोबतच स्वयं सहाय्यता समूहाने निर्मित केलेले विविध खाद्यपदार्थ, रसिकांसाठी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रांगोळी साचे, पूजेचे शोभिवंत ताट, पूजेचे साहित्य, विविध मसाले, सेंद्रीय धान्य व डाळी, मोहापासून निर्मित खाद्य पदार्थ, मध, मशरुमपासून निर्मित खाद्य पदार्थ प्रदर्शनीत विक्रीस राहणार आहे. दि.5 फेब्रुवारी रोजी समारोप होईल. समारोपाला जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलिस अधीक्षक कुमार चिंता, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी आदी उपस्थित राहणार आहे. यावेळी विविध पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात येणार आहे.
यवतमाळकरांनी या प्रदर्शनी व विक्रीस भेट देऊन स्वयंसहायता समूहांद्वारे निर्मित वस्तूंची खरेदी करावी आणि त्यांचा उत्साह द्विगुणात करावा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ व उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सारंग आगरकर यांनी केले आहे.