नवीन वीज कनेक्शन देताना विलंब नको संचालक विश्वास पाठक यांची सूचना

भंडारा :- नोव्हेंबर उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यावर सर्वाधिक भर दिला असून वीज ग्राहकांना नवीन कनेक्शन देताना विलंब करू नये, अशी स्पष्ट सूचना एमएसईबी सूत्रधारी कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी शुक्रवारी भंडारा येथे दिली.

महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभाग यांच्या कामकाजाचा जिल्हा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत पाठक बोलत होते. यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार राजू कारेमोरे, स्मार्ट् व्हिलेज डेव्हलपमेंट सोसायटीचे संस्थापक प्रकाश बाळबुधे, महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे, महावितरणच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, महापारेषणचे मुख्य अभियंता सतीश अणे आणि महाऊर्जाचे सरव्यवस्थापक वैभव पाथोडे यावेळी उपस्थित होते.

विश्वास पाठक म्हणाले की, वीज कंपन्यांनी ग्राहकांना दर्जेदार सेवा दिली पाहिजे, अशी उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्ट सूचना आहे. महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. नवीन वीज कनेक्शनसाठी आलेल्या अर्जांवर तातडीने कारवाई करून प्रमाण कालमर्यादेत विनाविलंब कनेक्शन दिली पाहिजेत. याबाबतीत कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी संपर्क साधून त्यांच्या अडचणी दूर करणे गरजेचे आहे.

त्यांनी सांगितले की, ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यानंतर त्या जागी कार्यरत ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा कालावधी कमीत कमी असला पाहिजे. ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याची नोंद करण्यापासून त्या जागी अन्य उपयुक्त ट्रान्सफॉर्मर बसविण्याची कार्यपद्धती पारदर्शक असणे आवश्यक आहे. या बाबतीत लोकप्रतिनिधींच्या सूचनांची प्राधान्याने अंमलबजावणी करावी.

सुनील मेंढे यांनी सांगितले की, ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला की शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते. ट्रान्सफॉर्मरची समस्या हाताळताना महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांबद्दल सहानुभूतीचा दृष्टीकोन बाळगला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे आरडीएसएस योजनेत वीज क्षेत्रातील सुधारणेसाठी प्रथमच मोठा निधी मिळाला आहे. त्याचा उपयोग करून प्रकल्पांची चांगल्या रितीने अंमलबजावणी करावी.

आमदार राजू कारेमोरे यांनी वीज क्षेत्रातील देखभाल दुरुस्तीवर भर देण्याची गरज व्यक्त केली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सेवेचा दृष्टीकोन ठेऊन ग्राहकांशी व्यवहार करावा, असे ते म्हणाले. प्रसाद रेशमे म्हणाले की, वीज ग्राहकांच्या अपेक्षा वाढत असून त्यानुसार सेवा देणे अपेक्षित आहे. नवीन वीज कनेक्शन निर्धारित वेळेत देणे आणि अखंड वीज पुरवठा करणे आवश्यक आहे.

महावितरण, महापारेषण, महाऊर्जा व विद्युत निरीक्षक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या कंपन्यांच्या भंडारा जिल्ह्यातील कामगिरीचे सादरीकरण केले.

NewsToday24x7

Next Post

राधाकृष्ण मंदिर में अन्नकूट सोत्साह सम्पन्न

Sat Nov 18 , 2023
नागपुर :- वर्धमान नगर स्थित राधाकृष्ण मंदिर में कार्तिक सुदी पंचमी पर अन्नकूट – छप्पनभोग दर्शन व प्रसाद वितरण सोत्साह सम्पन्न हुआ। सुबह भगवान राधाकृष्ण का दुग्धाभिषेक किया गया। मंदिर परिसर को केले के खम्बों व फूलों से सुसज्जित किया गया। छप्पनभोग दर्शन व महा आरती की गई। मैनेजिंग ट्रस्टी पवनकुमार पोद्दार ने बताया कि छप्पनभोग पूजन पोद्दार परिवार ने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com