रणाळ्याच्या स्मशानभूमीची दुरावस्था

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

स्मशानभूमी बनले अनधिकृत डम्पिंग यार्ड

कामठी :-‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते … मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते…’प्रख्यात कवी सुरेश भटांच्या या ओळीही कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या रणाळा गावातील स्मशानभूमीची दुरावस्था पाहल्यावर मरणाऱ्यांची सुटका मृत्यू नंतरही होत नाही हे प्रकर्षाने दिसून येत आहे तर या स्मशानभूमीत अनधिकृत डम्पिंग यार्ड तयार करण्यात आल्याने गावातील गोळा केलेला केरकचरा हा या स्मशानभूमी परिसरात घातले जाते त्यामुळे या अनधिकृत डम्पिंग यार्ड च्या दुर्गंधीमुळे नजीकच्या अलंकार नगरसह आदी परिसरात नाकीनऊ आले आहे.

कामठी तालुक्यातील रणाळा येथील दत्तात्रय नगरच्या कडेला असलेले जुनी स्मशानभूमी हटविण्यात यावे यासाठी मोठा संघर्ष झाला होता यासाठी गावाजवळील मोकळ्या जागेत शासकीय निधीतून स्मशानभूमी तसेच शेड सुद्धा उभारले होते यानंतर या स्मशानभूमी मध्येच अंत्यसंस्कार करण्यात यावे असे ग्रा प प्रशासनाकडून निर्देशित करण्यात आले होते मात्र जुनी स्मशानभूमी हटविणार नाही यातून पेटलेला संघर्ष लक्षात घेता निर्माण झालेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निकाली काढण्याचा उद्देशाने या संघर्षाला विराम देण्यात आला तर ऐच्छिक पातळीवर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतात मात्र या स्मशानभूमीत असलेल्या दुरावस्थेमुळे गावातील ग्रामस्थांना अंत्यसंस्कार कार्यक्रम पार पाडणे सोयीचे ठरत नसल्याने बहुधा कुटुंबातील अंत्यसंस्कार कार्यक्रम हे नाईलाजास्तव कन्हान नदी घाट वा कामठी च्या स्मशानभूमीत पार पाडण्यात येतात.गावातील विकासावर दरवर्षी कोटी रुपयाच्या आत खर्च केले जात असले तरी सगळ्यांचा अति महत्वाचा प्रश्न असलेल्या स्मशानभूमी दुरावस्थेकडे येथील ग्रामपंचायत प्रशासनासह लोकप्रतिनिधी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असून उलट अनधिकृत डम्पिंग यार्ड निर्मित करण्यात आले.

सात दशकानंतरचा स्वातंत्र्य मिळून कालावधी लोटला असला तरी गावाच्या प्राथमिक सुविधेपैकी स्मशानभूमी ही महत्त्वाची गरज असताना आजही तालुक्यातील काही मोक्याच्या गावात हक्काची स्मशानभूमी पोहोचली नाही.घरात दुःखाचे सावट असताना नागरिक मिळेल तेथे मरणयातना भोगत अंत्यविधी उरकताना पाहायला मिळत आहे.

रणाळा गावातील शासकीय स्मशानभूमीत जाणे म्हणजेच नरकयातनाचा अनुभव घेणेच आहे .स्मशानभूमीत पाण्याची कोणतीही सुविधा नसल्याने अंत्यसंस्कारा करिता मृतदेहा सोबत अंत्यविधिला घरूनच पाणी घेऊन जावे लागते.

आज रणाळा गावातील स्मशानभूमीची दुरावस्था असताना या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधीचे होणारे दुर्लक्ष सामान्य नागरिकांना वेदनादायी ठरत आहे त्यामुळे नाईलाजाने का होईना मृत्यूनंतर सुध्दा स्मशानभूमीत छळले म्हणण्याची वेळ आली आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com