सावनेर – दर्भाचे पंढरपूर म्हणून प्रसिध्द असलेल्या कळमेश्वर तालुक्यातील चंद्रभागा नदीच्या तिरावर वसलेल्या धापेवाडा येथील स्यंभू विठ्ठल रुख्मिणीचा दर्शन सोहळा आषाढ महिन्यातील एकादशीला तसेच कार्तिक वद्य व्दितीया व तृतीयेला गावातून मंदिरापर्यंत रथयात्रा निघते. इ.स. 1906 मध्ये श्रीमती भागीरथीबाई जमादार यांनी एक विशालकाय रथ बनवून विठ्ठल चरणी अर्पण केला. प्रतिवर्षी कार्तिक वद्य व्दितीया व तृतीयेला गावातून मंदिरापर्यंत रथयात्रा निघते. ही रथयात्रा 116 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. कार्तिक शुक्ल पक्षाच्या तिथीनुसार 22 नोव्हेंबरला रथयात्रा निघणार आहे. त्यानिमित्त येथील रथ यात्रेचा घेतलेला लेखरुपी आढावा….
कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षापासून ही यात्रा बंद असल्याने भाविकांच्या आनंदावर विरजण पडले होते. मात्र यावर्षी श्रीक्षेत्र रथयात्रेने दुमदुमणार. विजयादशमीनंतर येणाऱ्या एकादशीपासून स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात पहाटेला काकड आरती व सायंकाळी दिंडीला सुरुवात होते. हा कार्यक्रम सव्वा महिना चालतो. कार्तिक शुद्ध एकादशीला सायंकाळी हरिपाठानंतर कीर्तन व त्यानंतर मूर्तीचे गाव भ्रमण करण्यात येते. त्रयोदशीला मारुतीच्या वाहनावर व चतुर्दशीला गरुड वाहनावर आरुढ होऊन ‘श्री’ चे गाव भ्रमण केले जाते. पौर्णिमेला दुपारी काकड आरती समाप्ती होते व सायंकाळी चंद्रभागेच्या तिरी वाळवंटात गोपालकाला होतो. त्यानंतर श्रीचे पालखीद्वारे मंदिरात आगमन होते.
कळमेश्वरच्या उत्तरेस 8 कि.मी. अंतरावर चंद्रभागा नदीच्या किनारी धापेवाडा वसले आहे. धापेवाडा हे ‘धर्मनगरी’ या नावाने स्थान महात्म्यामध्ये नोंदवले आहे. येथील बहुसंख्य लोक कोष्टी आहेत. येथे कोलबा स्वामी महाराज इ.स.1657 ते 1761 मध्ये सिध्द पुरुष होऊन गेले. त्यांचा मठ धापेवाडा येथे आहे. कोष्टी समाजाचे हे एक पवित्र श्रध्दास्थान आहे. येथे संपूर्ण भारतातून भाविक येतात. देवस्थानातील गादी पुरुषांची व समाध्यांची पूजा करतात. आता मठातील गादीवर श्रीहरी महाराज वेळेकर कार्यरत आहेत. येथे कोलबा स्वामी महाराज व त्यांची पत्नी व त्यानंतर गादीवर आलेल्या वंशजांच्या समाध्या आहेत.
विठ्ठल मंदिर : कुंतलपुरच्या चंद्रहास राजाने केलेल्या तपश्चर्येतून मेटपांजरा येथे प्रकट झालेली गंगा चंद्रभागा नावाने प्रवाहित झाली अशी मान्यता आहे. चंद्रभागा नावाने ओळखल्या जाणाऱ्या नदीच्या डाव्या तिरावर जेथे चंद्रभागा उत्तर वाहिनी आहे तेथे विठ्ठल मंदिर आहे. येथील संत कोलबा स्वामी महाराज यांना विठ्ठल दर्शनाची तीव्र ओढ निर्माण झाल्यामुळे प्रत्यक्ष विठ्ठलाने त्यांना दृष्टांत देऊन मी स्वत: धापेवाडा येथे येतो, असे सांगितले व त्याप्रमाणे चंद्रभागेच्या काठी बाहुली (पायऱ्यांची विहीर) मध्ये त्यांना व अन्य एक सत्पुरुष उमाजी बाबा खोलकुटे यांना विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती प्राप्त झाल्या शके 1661 (इ.स 1740) आषाढी पोर्णिमेच्या सुमारास हा प्रसंग घडला. या स्थानालगतच एक मोठे मंदिर बांधून त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
विठ्ठल रुख्मिणी देवस्थानात प्रतिवर्षी एकादशी ते पंचमीपर्यंत उत्सव साजरा करण्यात येतो. तेव्हापासून हे स्थान विदर्भातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. आषाढ वद्य प्रतिपदा व कार्तिक वद्य प्रतिपदेदिवशी पंढरपूरचा विठ्ठल भक्तांच्या दर्शनासाठी धापेवाडा येथे येतो. अशी अख्यायिका आहे. पंढरपूर येथील प्रत्येक स्थान व वस्तू याही स्थानावर दाखविल्या जातात, नदीचे नावही चंद्रभागा असे रुढ आहे. या नदीकाठी पूर्वी एक घाट बांधला होता. या स्थानासंबंधी अनेक कथानके रुढ आहेत. अगदी रामचंद्राच्या काळात श्रीरामाने येथे शिवलिंगाची स्थापना केली आहे. (चैतन्येश्वर महादेव) अशी मान्यता आहे.
कोलबा स्वामी महाराज हे येथे ईश्वर भक्तीच्या ओढीतून आले. त्यांना रंगारी बुवा व त्यांचे गुरुबंधू मकरंदपुरी महाराज यांचा अनुग्रह प्राप्त झाला. त्याच काळात जानोजी भोसले यांचे प्रधान देवाजी पंत यांचे कारभारी उमाजी बाबा खोलकुटे हे ही येथे दर्शनासाठी येत. बाहुली विहिरीत प्राप्त झालेल्या विठ्ठल मूर्तीची स्थापना इ.स. 1741 मध्ये झाली. मंदिराचा गाभारा खोलकुटे यांनी बांधला. यांच्या मूर्ती सभामंडपातील स्तंभावर कोरल्या आहेत. या मूर्ती मूर्तीशास्त्राला अनुसरुन आकर्षक आहेत. हे एक जागृत स्थान मानले आहे.
मंदिराचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 42 बाय 26 मीटरचे असून मंदिराच्या सीमा भिंतीस चार बाजूस चार बुरुज आहेत. समोरील दोन बुरुजांवर लहान आकाराच्या दोन तोफा ठेवलेल्या आहेत. गाभाऱ्यावरील शिखर हे उत्तर मध्ययुगीन शिखरशैलीचा उत्कृष्ट नमूना आहे. एकात एक लहान होत जाणारे असे हे शिखर आहे. श्री. क्षेत्र धापेवाडाचा इतिहास अतिप्राचीन असून स्वयंभू विठ्ठल रुख्मिणी परमेश्वराची नगरी व संतांची कर्मभूमी म्हणून याची ख्याती आहे. या क्षेत्राचा इतिहास असलेल्या पुण्यपावन या भूमीला अनेक थोर संताचा स्पर्श लाभलेला आहे. हेच पंढरपूर धापेवाडा माझे माहेर आहे.
‘माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी…!’