– ‘वेद’तर्फे पर्यटन विकास परिषदेचे आयोजन
नागपूर :- नागपूरला टायगर कॅपिटल म्हणून ओळखले जाते. आसपास पेंच, कऱ्हांडला, ताडोबासारखे व्याघ्र प्रकल्प आहेत. मोठ्या संख्येने पर्यटक याठिकाणी येतात. या पर्यटकांना नागपुरात थांबविण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यासाठी चांगले हॉटेल्स, वाहतूक व्यवस्था आदींची गरज आहे. पण ते गुंतवणुकीतूनच शक्य आहे. मोठ्या प्रमाणात गुंतवणुक झाली तर पर्यटन क्षेत्राचा विकास शक्य आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) व्यक्त केला.
विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपेंट कौन्सिलतर्फे (वेद) पर्यटन विकासासंदर्भात ‘अमेझिंग विदर्भ’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ना. गडकरी बोलत होते. लक्ष्मीनगर येथील हॉटेल अशोक येथे झालेल्या या परिषदेला ‘वेद’चे अध्यक्ष रिना सिन्हा, संस्थापक गोविंद डागा, अमित पारेख, अतुल राठी यांची प्रमुख उपस्थिती होती. ना.गडकरी म्हणाले, ‘विदर्भात हॉटेल्स, रिसोर्ट, खाण पर्यटन, वॉटर स्पोर्टस तयार होण्याची गरज आहे. त्यासाठी स्थानिक गुंतवणूकदारांना ‘वेद’ने प्रोत्साहित करावे. त्यातून या प्रदेशातील पैसा याच ठिकाणी राहील आणि त्यातून रोजगारही निर्माण होईल. वेदसारख्या संघटनांनी विकास प्रकल्प तयार करुन त्याचे प्रेझेंन्टेशन गुंतवणूकदारांना द्यावे. गुंतवणुकदारांनी पुढाकार घेतला तर शासनातर्फे सवलती आणि पूर्ण सहकार्य केले जाईल.’
नागपूरचा आर्थिक विकास झाला तर नागरिकांची क्रयशक्ती वाढेल आणि त्यातून रोजगार निर्मिती होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ‘विदर्भात ताडोबा, पेंच, कऱ्हांडलासारखे व्याघ्रप्रकल्प आहेत. शेगाव, आंभोरा, धापेवाडा, माहूरसारखी तीर्थक्षेत्रे आहेत. गुंतवणूकदारांनी पुढाकार घेतला तर विदर्भात पर्यटन विकासाच्या संधी निर्माण होतील,’ असेही ना. गडकरी म्हणाले. यावेळी पर्यटन विकास विषयक अहवालाचे प्रकाशन ना.गडकरी यांच्या हस्ते झाले.