पोद्दारेश्वर मंदिराच्या शताब्दी शोभायात्रेचा रथ उपमुख्यमंत्र्यांनी ओढला, शहरातील दोन कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांचा सहभाग

नागपूर :- श्री पोद्दारेश्वर राम मंदिराच्या शोभायात्रेच्या शताब्दीनिमित्त शोभायात्रेचा रथ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओढून शोभायात्रेचा शुभारंभ केला. यावेळी रामभक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळाली.            पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, आमदार चंद्रशेखर बावणकुळे, माजी खासदार अजय संचेती यांच्यासह पोद्दारेश्वर राम मंदिराचे पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. शोभायात्रेपूर्वी उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामाच्या रथपुजनाला सुरुवात करण्यात आली. दरवर्षी नागपूर शहराच्या महापौरांच्या हस्ते ही पूजा करण्याची परंपरा आहे. नागपूर महानगरपालिकेत सध्या प्रशासक असल्यामुळे यावर्षी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य सर्व आमदार, माजी आमदार व उपस्थित गणमान्य मान्यवरांनी रथ ओढून या शोभायात्रेची सुरुवात केली.

नागपूरची रामनवमी शोभायात्रा ही संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. यंदाच्या शोभायात्रेत एकूण 83 रथ सहभागी झाले होते. वेगवेगेळ्या प्रकारचे व वेशभुषेतील रथ यावेळी पहायला मिळाले. उपराजधानीतील राम जन्मोत्सवाची ही प्राचीन परंपरा असून अवघ्या नागपूर शहरातील नागरिक दर्शनासाठी प्रमुख रस्त्यांवर उत्साहात असतात.

1923 पासून श्री पोद्दारेश्वर राम मंदिर येथून भव्य शोभायात्रा काढली जाते. यावर्षी शोभायात्रेत कोल्हापूरची महालक्ष्मी, आदासा गणपती, कोराडीची जगदंबा, धापेवाड्याचे विठ्ठल मंदिर, शेगावचे गजानन महाराज देवस्थान अशा चित्ररथांचे दर्शन गुरुवारी नागपूरकरांना झाले. शोभायात्रेच्या विविध मार्गांवर विविध भागात प्रवेशद्वार, चौकाचौकात विविध आकर्षक पौराणिक दृश्येही साकारण्यात आली होती.

रामनगर येथील शोभायात्रेला उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

रामनगर येथील राम मंदिरातून निघालेल्या शोभायात्रेचा प्रारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. यावेळी त्यांनी मान्यवरांसमवेत राम मंदिरातील पालखी व रामरथाचे पूजन केले.

पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, आमदार चंद्रशेखर बावणकुळे, माजी खासदार अजय संचेती, पश्चिम नागपूर नागरिक संघाचे अध्यक्ष रवी वाघमारे, सचिव राजीव काळेले, कोषाध्यक्ष विनोद जोशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या शोभायात्रेत यंदा 33 चित्ररथ सहभागी झाले होते. यात कुंभकर्ण वध, प्रहार झांकी, श्रीराम धनुष्यधारी, श्री गजानन महाराज, श्री जगदंबा देवी कोराडी, श्री संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान संदेश या चित्ररथांचा प्रामुख्याने समावेश होता.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com