मनपाद्वारे सायकल एक्स्पो १ जून रोजी

‘सायकल फॉर नागपूर’ : सायकल आणि सायकलिंग संबंधी साहित्यांची मिळणार माहिती

नागपूर :- ‘जागतिक सायकल दिना’च्या निमित्ताने ३ जून २०२३ रोजी सकाळी ६ वाजता नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील सायकलपटूंच्या सहकार्याने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीच्या अनुषंगाने गुरूवारी १ जून २०२३ रोजी यशवंत स्टेडियम येथे सायकल एक्स्पोचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या दिवशी सकाळी ७.३० वाजतापासून सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत हे एक्स्पो शहरातील नागरिकांकरिता खुले राहिल. नागपूरकरांमध्ये सायकलिंगबाबत जनजागृती निर्माण व्हावी व जास्तीत जास्त नागरिकांनी सायकलचा वापर करावा, या उद्देशाने या एक्स्पोचे मनपाद्वारे आयोजन करण्यात येत आहे.

सायकल एक्स्पोमध्ये शहरातील विविध सायकल विक्रेते, सायकलिंगशी संबंधीत साहित्यांचे उत्पादक आणि विक्रेते आदींनी मोठ्या संख्येने आपला सहभाग दर्शविण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. विशेष म्हणजे या एक्स्पोच्या ठिकाणी सायकल रॅलीकरिता प्रथम नोंदणी केलेल्या 3000 सहभागींना टी-शर्ट देखील प्रदान करण्यात येणार आहे. सायकल एक्स्पोमध्ये नागरिकांना विविध प्रकारच्या सायकल तसेच सायकलिंग करताना आवश्यक साहित्य आदी सर्वांची इत्यंभूत माहिती एकाच ठिकाणी प्राप्त होणार आहे.

नोंदणीला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

३ जून २०२३ रोजी सकाळी ६ वाजता नागपूर महानगरपालिका मुख्यालय, सिव्हिल लाईन्स येथून सुरू होणा-या १६ किमीच्या सायकल रॅलीमध्ये सहभागी होण्याकरिता ऑनलाईन नोंदणीला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी करण्यासाठी मनपाच्या अधिकृत www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावरील ‘World Bicycle Day Rally Registration Form’ यावर क्लिक करून आवश्यक माहिती भरून नि:शुल्क नोंदणी करता येईल. इच्छूकांनी ३१ मे पर्यंत ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी झालेल्या सहभागींना मनपातर्फे टी-शर्ट दिली जाणार आहे. या टी-शर्ट एक्स्पोच्या स्थळी यशवंत स्टेडियम येथेच सहभागींना प्रदान करण्यात येणार आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com