संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-पोलिसांच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचे वाहन
कामठी ता प्र 22 :- कामठी शहरात मागील काही दिवसांपासून घरफोडी सह चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढीस आहेत.काल रात्री कुंभारे कॉलोनीत एका मोकाट डुकराच्या हल्ल्यात जख्मि झालेला इसम कुटुंबासह उपचारार्थ रुग्णालयात गेला तर भावनाशून्य या अज्ञात चोरट्यांनी घर कुलूपबंद असल्याचे संधी साधून घरफोडी केली.तेव्हा या वाढत्या चोऱ्यावर नियंत्रण मिळविण्याकरीता पोलिसांचे अतोनात प्रयत्न सुरू आहेतच त्यासोबतच नागरिकांनी तथा व्यवसायीकांनी सुद्धा सतर्कता बाळगून होणाऱ्या घटना कश्या टाळता येईल यासाठी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
शहरात मागील काही दिवसापासून चोरट्यांच्या वतीने खास करून बंद घरे फोडण्याचे सत्र सुरू असून घरफोडीच्या घटना वाढीवर आहेत.त्यामुळे नागरिकांनी बाहेरगावी तथा कुठेही बाहेर जाताना त्याची शेजाऱ्यांना कल्पना द्यावी तथा तीन चार दिवस बाहेरगावी जायचे असल्यास घरी कुणी नातेवाईक ठेवून जावे तथा तशी सूचना पोलीस स्टेशन मध्ये देऊन जाणे गरजेचे आहे जेणे करून त्या भागात पोलीस गस्त वाढविता येईल.दुचाकी वाहने आपल्या कंपाउंड मध्ये ठेवावे तसेच पाळीव प्राण्याकरिता पक्के गोठे बांधावे जेने करून चोरटे त्यावर हात साफ करणार नाही .
घरोघरी जाऊन विविध वस्तू विक्री करीत असलेल्या कडून खात्री करूनच वस्तू खरेदी कराव्या ,मोबाईलद्वारे करण्यात येणाऱ्या आर्थिक व्यवहार प्रकरणी अधिक दक्षता बाळगावी , आपला मोबाईल कोणत्याही नविन व्यक्तीस वापरण्यास देऊ नये किंवा मोबाईल नंबर , ओटीपी सांगू नये , लग्न किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रमात महिलांनी आपल्या अंगावरील सोन्याच्या दागीण्याबाबत विशेष काळजी घ्यावी , बस ट्रेन मध्ये चढताना सुद्धा आपल्या अंगावरील सोने तसेच पर्स कडे विशेष लक्ष द्यावे, कोणताही संशय आल्यास लगेच 112 नंबर डायल करून पोलिसांना माहिती द्यावी , पोलीस असल्याची बतावणी करून भुलथापा देणाऱ्याकडून सावध राहावे, बँकेतून काढून आणलेले पैसे बाहेर आल्यानंतर कोणासही न दाखवता थेट आपले घर गाठावे, सर्व व्यापारी तसेच सराफा व्यवसायिकांनी आपल्या मुख्य प्रवेशद्वारजवळ सीसीटीव्ही केमेरे लावावे शक्य असल्यास नागरिकानी सुद्धा आपल्या घर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावे तसेच नागरिकांनी सतर्कता बाळगावे असे आवाहन नविन कामठी पोलीस स्टेशन तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन च्या वतीने करण्यात येत आहे.