जादूटोणा विरोधी कायद्याविषयी प्रभावी जनजागृती करा – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

नागपूर :- नरबळी आणि इतर अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी, त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी या कायद्यातील तरतुदींची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रभावी जनजागृती करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या विभाग स्तरावरील जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीच्या सभेत विभागीय आयुक्त बोलत होत्या. समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, आदिवासी विकास विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी निर्मल झाडे, तंत्र शिक्षण विभागाचे सहायक संचालक सचिन सोळंकी, शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे रवींद्र पाटील यावेळी उपस्थित होते.

जादूटोणा विरोधी कायद्याची जनजागृती करण्यासाठी जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीने कार्यशाळा, जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करावे. तसेच चित्रफिती, समाजमाध्यमे यांचा प्रभावी वापर करून लोकांमध्ये कायद्याविषयी जागृती करावी. शाळा, महाविद्यालय स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना कायद्यातील तरतुदींची माहिती द्यावी, असे बिदरी यावेळी म्हणाल्या.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com