युवक काँग्रेसच्या शिबिरात कार्यकर्त्यांना आवाहन
नागपूर – काँग्रेसचे नेते माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांनी आपल्याला दिलेला विचार, त्यांची ध्येयधोरणे, युवकांना राजकारणात दिलेली भागीदारी, आयटी क्षेत्रातील क्रांती, पंचायत राज लागू करण्याचा निर्णय या सर्व गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन अखिल भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले.पक्ष, संघटनेसाठी जोमाने काम करा, त्यामुळे तुमचे मनोबल वाढेल, आपसांत भांडत बसू नका, असा सल्लाही त्यांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला. नागपूर जिल्ह्याच्या पेंच, सिल्लारी येथे आयोजित निवासी शिबिरात ते बोलत होते. 

याप्रसंगी युवक काँग्रेसचे सरचिटणीस व प्रशिक्षण प्रमुख सीताराम लांबा, महाराष्ट्र प्रभारी हरपाल सिंग, सहप्रभारी विजय सिंग राजू, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभिजित सकपाळ, अमर खानापुरे, गौरव पांडव आदी उपस्थित होते.
अल्लावरू म्हणाले, राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी २१ मे रोजी नवी दिल्लीत मोठा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी काश्मीर ते कन्याकुमारी आणि मुंबई ते आसामपर्यंतचे लोक उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी तयारी करा, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेसचा विचार,ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहचवून पक्ष, संघटना आणखी मजबूत करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस पक्षात युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी काय केले पाहिजे, कुठली धोरणे राबविण्याची गरज आहे, याविषयी त्यांनी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सूचना मागविल्या.
या सूचना १३ ते १५ मे रोजी राजस्थानच्या उदयपूर येथे होणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरात मांडण्यात येणार असल्याची माहिती अल्लावरु यांनी दिली. यावेळी युवक काँग्रेसचा इतिहास सोशल मीडिया, ओटीपी प्लॅटफॉर्मवर सिरीजच्या माध्यमातून दाखविला जावा, आदिवासींच्या हक्कासाठी असलेले वन कायद्याची माहिती द्यावी, सरकारी जमिनी शेतीसाठी युवकांना लिजवर अथवा भाड्याने द्या, अशा सूचना युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अल्लावरू यांच्यापुढे मांडल्या.
