– हजारोंची उपस्थिती, अनेक महिलांच्या कला, कौशल्याला मिळाले व्यासपीठ
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे रेशीमबाग मैदानात मागील सात दिवस सुरु असलेल्या महिला उद्योजिका मेळाव्याचा मंगळवारी (ता.११) समारोप झाला. रेशीमबाग मैदानात सायंकाळी आयोजित समारोपीय कार्यक्रमाला मनपा उपायुक्त विजया बनकर, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, मनपा महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती प्रगती पाटील, माजी नगरसेविका सारिका नांदूरकर, कीर्तिदा अजमेरा, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त नरेंद्र बावनकर, कनिष्ठ अभियंता सचीन चामटे, सामाजिक कार्यकर्ता कविता इंगळे, सामाजिक कार्यकर्ता प्रीती राजदेकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील महिला उद्योजिका, महिलांच्या कौशल्याला वाव मिळावा, त्यांच्या गृहोद्योगातील हस्त कौशल्याचा विकास व्हावा, त्यांच्या पाक कौशल्याला चालना मिळावी तसेच बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार करण्यास प्रोत्साहन मिळावे या हेतूने महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या नेतृत्वात ५ ते ११ मार्च २०२५ या कालावधीमध्ये हा मेळावा संपन्न झाला. मेळाव्याच्या समारोप समारंभात सात दिवसात सर्वात जाती विक्री केलेल्या स्टॉल्सला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. तसेच समाज कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला. या मेळाव्यात ३० लाखांच्या वर स्टॉल्समधून विक्री करण्यात आली.
महिलांनी सात दिवसाचं नाही तर ३६५ दिवस उद्योजिका म्हणून कार्य करावे. महिलांचे कार्य आणि नाव समाजात समोर आणावे असे समारोप कार्यक्रमाच्या वेळी बोलतांना मनपा महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती प्रगती पाटील म्हणाल्या. तसेच त्यांनी समाज कल्याण विभागाने महिला उद्योजिका मेळावा यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल कौतुक केले.
११ मार्च कार्यक्रमाच्या समारोपच्या दिवशी निश्चयाचा महामेरू हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम श्रेया खराबे व त्यांच्या चमूद्वारे सादर करण्यात आला.
आठवडाभर रंगारंग कार्यक्रम आणि विविधारंगी उत्पादनांच्या स्टॉल्सची मेजवानी या मेळाव्याच्या माध्यमातून नागपुरकरांना मिळाली. या मेळाव्याला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भेट देउन नवउद्योजक महिलांना प्रोत्साहन दिले.मेळाव्यामध्ये महिलांच्या व्यवसाय, उद्योगासोबतच त्यांच्या कौशल्यालाही व्यासपीठ मिळवून देण्यात आले. मेळाव्यात पाककला स्पर्धा, महिलांकरिता शासकीय योजनांची माहिती, क्रीडा स्पर्धा, महिलांकरिता आरोग्य तपासणी, तयार केलेल्या वस्तूंच्या पॅकेजिंग, लेबलिंग, मार्केटिंग, ई-मार्केटिंग आदीचे प्रशिक्षण, युवतींकरिता रोजगार मेळावा असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमांमुळे अनेक महिलांच्या कौशल्याला नवी दिशा मिळाली.
महिला उद्योजिका मेळाव्यात विविध महिला उद्योजिका, बचत गटाच्या महिलांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीकरिता २५० स्टॉल्स उपलब्ध करुन देण्यात आले. मेळाव्यात मनपातर्फे महिलांच्या सक्षमीकरणाकरीता सुरु असलेल्या विविध योजनांच्या पात्र लाभार्थांना तसेच दिव्यांग महिलांना धनादेश वितरीत करण्यात आले. मेळाव्याला केंद्रीय परिवहन महामार्ग विभाग मंत्री नितीन गडकरी, सुप्रसिद्ध गायिका व समाजसेविका अमृता फडणवीस, विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे आदी मान्यवरांनी भेट दिली. तसेच महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल व समाज विकास विभागाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी मेळाव्याला वेळोवेळी भेट देत दरदिवशी नियोजनाचा आढावा घेत मेळाव्यात झालेल्या कार्यक्रमांना आपली उपस्थिती दर्शविली.
या मेळाव्यात नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांची मेजवानी देण्यात आली होती. यात महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सारंग जोशी, मुकुल पांडे, निकेता जोशी यांच्यासह नागपूर शहरातील यशस्वी वाद्यवृंद यांनी आपली कला सादर केली. ६ मार्च रोजी प्रसन्न जोशी आणि त्यांच्या चमूद्वारे गझल संध्या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. ७ मार्च रोजी सचिन डोंगरे ग्रुप व अवंती काटे ग्रुप यांचे नृत्य रंग कार्यक्रम झाला. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका स्थापनेच्या अमृत महोत्सवा निमित्त फॅशन शोचे आयोजन करण्यात आले. ९ मार्च रोजी हृषिकेश रानडे व त्यांच्या चमूचे ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आले होते. १० मार्च रोजी राजेश चिटणीस आणि त्यांच्या ग्रुपद्वारे हिंदी मराठी गाण्यांचा स्वरजल्लोष कार्यक्रम तसेच कॉमेडी तडका कार्यक्रम सादर करण्यात आला. ११ मार्च रोजी निश्चयाचा महामेरू हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम श्रेया खराबे व त्यांच्या चमूद्वारे सादर करण्यात आला.