बारा वर्षाच्या कालावधीत महानगरपालिकेकडून विविध लोकोपयोगी विकासकामे पूर्णत्वास – आयुक्त विपिन पालीवाल

आयुक्तांच्या हस्ते तक्रार निवारण ॲपचा शुभारंभ

मनपा स्थापना दिनानिमित्त माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा

चंद्रपूर :- 25 ऑक्टोबर 2011 रोजी नगरपालिका संपुष्टात येऊन चंद्रपूर महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली. स्थापना झाल्यापासून ते आजपर्यंत 12 वर्ष पूर्ण झाली. 2011 ते 2022 या कालावधीत चंद्रपूर महानगरपालिकेने विविध लोकोपयोगी कामे केली असून अनेक विकासकामे करण्यात आली आहे. यापुढेही ही विकासकामे निरंतर सुरू राहील, अशी ग्वाही महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विपिन पालीवाल यांनी दिली.

महानगरपालिकेच्या स्थापना दिनानिमित्त माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा पालिकेतील राणी हिराई सभागृहात आयोजित करण्यात आला होता.यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी, माजी महापौर सर्वश्री राखी कंचर्लावार, अंजली घोटेकर, संगीता अमृतकर, उपायुक्त अशोक गराटे तसेच विविध विभागाचे अधिकारी व महानगरपालिकेचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

शासनाच्या आदेशान्वये पालिका स्थापना दिवस साजरा करण्याच्या सूचना होत्या असे सांगून आयुक्त पालीवाल म्हणाले, महानगरपालिकेचा हा पहिलाच स्थापना दिवस आहे, अगदी कमी कालावधीत या स्थापना दिवसाचे नियोजन करण्यात आले, यापुढे हा स्थापना दिवस अधिक चांगल्या पद्धतीने आयोजित करू.

नागरिकांच्या तक्रार सोडविण्यासाठी आणि तक्रारीच्या निराकरणासाठी तक्रार निवारण ॲप सुरू करण्यात आली आहे. तक्रार ऑनलाइन करता यावी यासाठी हे ॲप महत्त्वपूर्ण ठरेल. यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 2574 010 व व्हाट्सअप क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहे. सदर तक्रार फोटोसहीत ॲपवर नोंदवावी,सदर तक्रार संबंधित विभागाकडे पाठविण्यात येईल. व त्या तक्रारीची दखल त्या विभागाकडून घेण्यात येईल.

शहरात 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत स्वच्छता लीग सुरू करण्यात येत आहे, याद्वारे वर्दळ असलेल्या जागेची स्वच्छता, वृक्ष लागवड, पेंटिंग, लोकसहभागाच्या माध्यमातून श्रमदान करण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. चंद्रपुरात राजकीय पदाधिकाऱ्यां मध्ये एकोपा असून या काळामध्ये शहरात चांगली कामे झाली असल्याचे ते म्हणाले.

यावेळी माजी महापौर अंजली घोटेकर म्हणाल्या, 25 ऑक्टोबर 2011 रोजी नगरपालिका बरखास्त करून महानगरपालिकेचे निर्मिती झाली. चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा विकास करण्याचा ध्यास सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घेतला. मी महापौर असताना राणी हिराई सभागृहाचे नामकरण करण्यात आले. चंद्रपूर ही माता महाकाली ची ऐतिहासिक नगरी आहे, त्यामुळे चार वेळा महानगरपालिकेवर महिलांचे राज्य राहिले.

माजी महापौर राखी कंचर्लावार म्हणाल्या, शहरात उत्तम व नाविन्यपूर्ण अशी कामे झाली, कामे करतानाच त्या कामांचे मेंटेनन्स सुद्धा होणे गरजेचे आहे. नागरिकांनी शहराचे सौंदर्य, स्वच्छता व हिरवळता जपावी. शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी खुल्या जागेवर उद्यानाची कामे झाली. यापुढेही अशी कामे पूर्णत्वास येईल. त्यासोबतच चंद्रपूर शहर हिरव कसं करता येईल याचा सर्वांनी प्रयत्न करावा असेही त्या म्हणाल्या.

शहरात अमृत योजनेअंतर्गत जी कामे पूर्णत्वास येत आहे ती लवकर व्हावी. असे प्रथम माजी महापौर संगीता अमृतकर म्हणाल्या.

कार्यक्रमाचे संचालन मनपा शिक्षणाधिकारी नागेश नीत तर आभार अनिल घुले यांनी मानले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com