बचत गटाचे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करा  – संघमित्रा ढोके

नागपूर :- दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत सर्व स्थापित बचत गटाचे सर्वेक्षण दिलेल्या वेळेत पूर्ण कराव्यात अशा सूचना नगरपरिषद प्रशासन विभागाच्या सह आयुक्त संघमित्रा ढोके यांनी दिल्या.

दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत नगर पालिका प्रशासन यांच्यावतीने नागपूर विभागासाठी दिनांक 24 मार्च रोजी एक दिवशीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. कार्यशाळेला नगर पालिका प्रशासन आयुक्त प्रकाश राठोड, शहर व्यवस्थापक अमोल देशपांडे, प्रकाश दराडे, ऋतविक जोशी, एस्तेर रायबोर्ड, नूतन मोरे, यांच्यासह नागपूर विभागातील नगरपालिकांचे सर्व शहर व्यवस्थापक व सहाय्यक प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.

नागपूर विभागात बचत गटाची संख्या लक्षणीय आहे. बचत गट आणि महिला हे समीकरण आहे. प्रत्येक जिल्ह्यात आणि गावागावांमध्ये अनेक छोटे मोठे गट कार्यरत आहे. यासर्व बचत गटाच्या लाभार्थ्यांपर्यंत यंत्रणेने शासकीय योजना पोहचवाव्या असे ढोके यांनी सांगितले.

दीनदयाल अंत्योदय योजनेतील राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत सामाजिक अभिसरण, संस्थात्मक घटक व बचत गटाची स्थापना करण्यात येते. बचत गटातील महिलांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संपूर्ण माहिती ही ऑनलाईन भरून सादर करावी, या विषयावर उपस्थितांना प्रशिक्षण देण्यात आले. कुटुंबातील सदस्यांचे ऑनलाईन सर्व्हेक्षण करण्यासाठी maharashtrashg.com हे पोर्टल तयार करण्यात आले आहे. पुष्पलता अवझे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com