अंबाझरी धरणाची अल्पमुदतीची कामे जुनच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करा – विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

नागपूर :- अंबाझरी धरणाच्या सांडव्याचे पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही पुलांचे बांधकाम, मातीबांध बळकटीकरणाचे कामे, क्रेझी कॅसल येथील उर्वरित दोन पूल तोडण्यासह परिसरातील नदी व नाले सफाई आदी अल्पमुदतीची कामे येत्या जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज येथे दिले.

अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी गठीत विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

बैठकीस समितीचे सदस्य सचिव तथा मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते, सदस्य जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अधिक्षक अभियंता ज.ह.भानुसे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता पी.के.पवार, मनपाच्या अधिक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी , उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांच्यासह महामेट्रोरेल, नागपूर सुधार प्रन्यास, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदी विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी विविध शासकीय यंत्रणांच्या समन्वयाद्वारे समितीद्वारे सुरक्षेच्यादृष्टीने अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. याअंतर्गत अंबाझरी धरणाच्या सांडव्यावरून वाहणारा विसर्ग व्यवस्थितरित्या वाहून जाण्यासाठी नवीन पूल बांधण्याचे काम सुरु असून हे काम वेळेत पूर्ण करुन दुसऱ्या पुलाचे बांधकामही हाती घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश श्रीमती बिदरी यांनी दिले. ही कामे करतांना सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण यांनी वीज वाहिन्यांची कामे पूर्ण करण्यासह येथे वाहतुकीच्यादृष्टिने उचित उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

क्रेझी कॅसल परिसरात विविध उपाय योजनांतर्गत जवळपास 64 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. येथील एकूण 8 पूलं तोडण्याची कामे हाती घेण्यात आली असून आतापर्यंत 6 पूल तोडण्यात आली आहेत. उर्वरित 2 पूलं जुनच्या पहिल्या पंधरावड्यापूर्वी तोडण्याचे निर्देश देत या भागातील नाग नदी खोलीकरण व रुंदीकरणाचे कामही वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणांतर्गत मातीबांध बळकटीकरणाचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. शहरातील रस्त्यांवर धोकादायक स्थितीतील झाडांची छटाई तसेच नदी-नाल्यांच्या सफाईची कामेही नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी यंत्रणांना देण्यात आले. अंबाझरी धरण परिसरातील स्वामी विवेकानंद यांचा पुतळा स्थलांतरीत करण्याच्या विषयावरही चर्चा झाली.

अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणाच्या कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात येत असून या कामांच्या प्रगतीचा अहवाल समितीतर्फे उच्च न्यायालयाला नियमितपणे सादर करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शालांत परीक्षेत मनपाच्‍या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Tue May 28 , 2024
– मनपाच्या शाळांचा ८७.५९ टक्के निकाल – ८ शाळांचा १०० टक्के निकाल, तर 11 शाळा ९० टक्के यांच्यावर नागपूर :- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, परीक्षेत नागपूर महानगरपलिकेच्‍या विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यार्थांना मिळालेल्‍या यशाबद्दल मनपा आयुक्‍त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com